कालाय तस्मै नमः (कोरोना आणि आपण)
असे नाव देण्याचे कारण, काळ (वेळ) हि निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या अस्तित्वाची किंमत दाखवून देते. खरेतर माणसांची लायकी दाखवुन देते म्हणा ना हवे तर. स्वतः ला उत्क्रांतीच्या सप्तसोपानावर आरूढ समजणाऱ्या मानवाला निसर्गाने दिलेली कोरोनारुपी चपराक आहे ही. माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याच्या संकल्पना ज्यामुळे बदलतात त्यामध्ये साथींच्या आजारांचा सिंहाचा वाटा आहे, पण हे क्षेत्र खुपच दुर्लक्षित आहे. इतिहासामध्ये मानवाच्या प्रगती मध्ये जी मोठी आणि अनपेक्षित वळणं आली आहेत त्यातली बरीचशी साथींच्या आजारामुळे आहेत. उदा. युद्धाचे निकाल बदलण्याची आणि विज्ञानाची प्रगती सुरू होण्याची सुरुवात सुद्धा ह्या साथींच्या काळात झालेली आहे. या काळात अर्थव्यवस्था, धर्मकारण आणि राजकारण हे आरोग्य व्यवस्थेनंतर झटका खाणारे विभाग आहेत.
ज्यावेळी जगात औषधशास्त्र बाल्यावस्थेत होते. तेव्हा अशा आजारांवर धार्मिक उपचार व्हायचे. मागील जन्माचे पाप किंवा आयुष्यात केलेल्या चुका यांमुळे हे आजार होतात असे त्यावेळेनुसार काढलेला अर्थ किंवा निष्कर्ष होता. जगातील सर्व धर्मानी हा निष्कर्ष लक्षात ठेवला पण तो कोणत्या परिस्थितीत काढला आहे याकडे डोळेझाक केली. त्यामुळे आजही उदा. कुष्ठरोग आणि मानसिक आजार हे देवाचा आणि धर्माच्या अपमान केल्यामुळे होतात अशी समजुत आहे. आणि अशा प्रकारे आजार होणे ही त्यावरती केलेली शिक्षा आहे. यातुन बाहेर पडायचे असेल तर, त्यासाठी कर्मकांडांची मोठी जंत्री उभी केली गेलेली आहे. मानसिक आजार तर आणखी सुद्धा प्रचंड प्रमाणात या पगड्याखाली आहेत. या साथीच्या निमित्ताने लोकांना ही गोष्ट कळो आणि त्या मानसिक आजार असणाऱ्यां निष्पाप रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळो ही इच्छा. सगळ्यात विशेष आणि लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे कित्येक धर्मांचा उदय आणि अस्त अशा साथींच्या आजारात झालेला आहे.
1334 ते 1400 या काळात अशीच एक भयानक साथ येऊन गेली आहे. प्लेग ची त्यावेळेस पंधरा कोटी लोक या साथीने मारले गेले होते. युरोप मधली 60% लोकसंख्या यात बळी पडली होती. आणि आता आधुनिक वैद्यक शास्त्रा मुळे आपण असे आजार खुप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आहोत. तुम्हांला कळते तेंव्हापासून प्लेगने माणूस मेल्याचे ऐकले आहे का ? नाही ना म्हणून येथुन पुढे मॉडर्न मेडिसिनला शिव्या घालण्याआधी थोडा विचार करा, आपण जिवंत त्याच्या जीवावर आहोत. परंतु त्या काळी मॉडर्न मेडिसिन नव्हते, मग लोकांनी त्या वेळेसच्या समजुतीनुसार कारण शोधायला सुरुवात केली. काही धर्मांना यासाठी कारणीभूत ठरवण्यात आले. तर काही धर्मांनी आपल्यातील स्त्रियांना यासाठी कारणीभूत ठरवले. त्यावेळेस झालेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड डॉक्टर लोक सुद्धा मृत्युमुखी पडलेले त्यामुळे भोंदू बाबांनी त्यांची दुकानं मांडलेली आणि काहीही थातूर मातूर उपचार सुरू केलेले. हे सगळे सांगायचे कारण या चालीरीती कशा तयार झाल्या याची तुम्हांला माहिती व्हावी हा उद्देश.
कोरोनाची साथ, ही काय एकदम घडलेली गोष्ट आहे असे मात्र नाहीये. माणसांची वाढलेली लोकसंख्या, नैसर्गिक सामुग्रीचा चाललेला विनाश, जागतिकीकरण आणि वाहतुकीच्या साधनांत झालेली प्रगती, जीवघेणी शस्त्रास्त्र स्पर्धा, प्रति-जैविकांचा वारेमाप वापर आणि लसीकरणाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. या आणि अशा बऱ्याच गोष्टींनी वैश्विक साथीला पोषक असे वातावरण तयार करून ठेवले होते. गरज होती ती ठिणगी पडण्याची आणि ती चीन देशातील वुहान या शहरात पडली. आणि मग अगदी इतिहासात घडलेल्या गोष्टींची जशीच्या तशी पुनरावृत्ती पहायला मिळते आहे. यातुन आपण काही शिकू शकतो का ? यासाठी हा सगळा उहापोह.
अशा साथीत सर्वात महत्वाचे असतात आरोग्य कर्मचारी. हे तर दुतर्फा कोंडीत सापडलेले असतात, आजार आणि त्याच्याशी तोंड देताना होणारे भावनिक आंदोलने यामध्ये यांचा अगदी कस लागतो. साथीमध्ये सगळ्यात जास्त आजारी पडणारे देखील हीच मंडळी असतात. त्यातच जर आरोग्य व्यवस्था तयार नसेल तर यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. साथींच्या आजारांचे वैशिष्ट्य म्हणजे हे नेहमी अचानक चालू होतात आणि सरकारी व्यवस्थेचा झोपलेल्या अजगराला जागा व्हायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे ही मंडळी बिचारी शस्त्रा शिवाय त्या सूक्ष्म पण भयावह शत्रूशी दोन हात करत असतात. आणि अनिश्चितता यांच्या पाचवीला पुजलेली असल्यामुळे भयानक मानसिक त्रासातून जात असतात. यांच्यासाठी योग्य साधनांची उपलब्धता आणि पुरेशी विश्रांती हे सगळ्यात चांगले उपाय आहेत. आणि या दोन्ही गोष्टी यांच्या हातात नसतात.
क्वारंटाईन (Qurantine) हे अशा साथीमध्ये वापरलेले सर्वात प्रभावी माध्यम. 1377 ला सगळ्यात पहिल्यांदा हे वापरण्यात आले. ट्रेनटाईन (Trentine) म्हणजे तीस दिवस वेगळे ठेवणे. आधीच्या साथींच्या आजारातून आपण हे शिकलो होतो की, ठराविक वेळ जर एखाद्याला निरीक्षणाखाली ठेवले आणि त्याला आजार झाला नाही म्हणजे तो सेफ आहे, सगळ्यात महत्वाचे याला जर परत शहरात घेतले तर बाकीचे लोक आजारी पडणार नाहीत. याचेच पुढे क्वारंटाईन (Qurantine) म्हणजे चाळीस दिवस असे करण्यात आले. आजही ज्या आजारांवर उपचार नाही, त्यांच्यासाठी हीच प्रभावी पद्धत उपलब्ध आहे.
2016 ला आलेल्या झिका व्हायरस च्या साथीमध्ये सोशल मीडिया चा अभ्यास करण्यात आला. असे लक्षात आले की प्रत्येक पाच पोस्ट पैकी चार ह्या बरोबर होत्या, पण ज्या समाज माध्यमांमध्ये खुप ट्रेंडिंग होत्या त्या साफ चुकीच्या होत्या. असे का होते ? यावरती संशोधन चालू आहे, कारण यामुळे आपल्याला याचा वापर योग्य माहिती देण्यासाठी करता येईल. यातुन तर नक्कीच खुप मोठा मेसेज आपल्या सगळ्यांसाठी आहे.