इंटरनेट ऍडिक्शन ( Internet Addiction )
लहानपणी “इंटरनेट शाप की वरदान” या विषयावर मोठ्या हिरीरीने वाद विवाद स्पर्धा व्हायच्या. दोन्ही मतं पटायचे. पण आत्ता लहान मुलांची व किशोरवयीन आणि तरुण पिढीची मानसिक स्थिती ढासळताना पाहून इंटरनेट हा न संपणारा शापच आहे हेच मत बनते. बाल्यावस्था, कुमार वय व तारुण्य या स्थित्यंतरातून जाताना शारीरिक व मानसिक बदल होताना इंटरनेटमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून मुलांचे संपुर्ण व्यक्तिमत्वच बिघडताना पाहिल्यावर फार दुःख होते.
इंटरनेटचे व्यसनाबद्दल आजकाल जाता येता कोणी ना कोणी सांगत असतो. इंटरनेट चे पण व्यसन होऊ शकते ही काही आता नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी, पण आपल्यापैकी कोणीतरी हे गांभीर्याने घेतलेय का? आपल्या मुलांना इंटरनेटचे व्यसन आहे की नाही हे कोणी तपासल आहे का? त्याबद्दल काय करू शकतो हे जाणल आहे का?
कॉम्प्युटरचा शोध लागला. मोठी क्रांती झाली. बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. कम्प्युटरची प्रगती मागच्या दहा वर्षांमध्ये इतकी वाढली की,15 इंचाचा कंप्यूटर स्क्रीन, पाच इंचाच्या छोटा स्मार्टफोनमध्ये बदलला. स्मार्टफोन हळूहळू स्मार्ट होत चाललाय आणि त्याबरोबर माणसे समजदारी विसरू लागले. इतर दुष्परिणामही दिसू लागले. जग बदलल पण माणूस बदलला नाही. आणि समज नसलेल्या माणसाला समजदार मोबाईल मिळाला. मोबाईलच मग माणसांना कंट्रोल करू लागला. मोबाईलच्या सूचना (नोटिफिकेशन) प्रमाणे माणसांचे वेळापत्रक बनले. आजकाल माणूस मोबाईलमध्ये इतका हरवला की त्यालाच आता कळत नाही की तो आणि त्याचा मोबाईल हे वेगवेगळे आहेत. आपण शरीराच्या भागासारखा मोबाइलला प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जात असतो जणूकाही मोबाईल शरीराचा अविभाज्य घटक झाला आहे.
तशातच सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम निराळेच. आज-काल सायबर क्राईम नावाची एक ब्रांच पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होऊ लागली. पण या सायबर क्राईम सोबत घराघरात सायबर मुळे होणारे दुष्परिणाम काही दिसू लागले नाही. दिसणारच नाही हो. कारण ते एका आठवड्यात किंवा महिन्यात होत नाहीत. मुलगा मोबाईल वापरायचा शिकतो, मग गेम्स खेळतो, व्हिडिओ पाहतो, सोशल मीडिया वापरतो, चाटिंग करतो, आणि हळूहळू इंटरनेटच्या व्यसनात पडतो. हा क्रोनिक आजार आहे. क्रोनिक म्हणजे वर्षोनवर्षे वाढत जाणारा. या आजाराला आता शस्रशुद्ध प्रमाणही मिळालं आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे हे सिध्द होऊन, इंटरनेट addiction बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने जागृती कार्यक्रम सुरु केलेले आहेत.
सकाळी उठल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तींना गुड मॉर्निंग म्हणण्याआधी किंवा त्याच्याशी काही बोलण्याआधी, जर आपण मोबाईल पहात असाल तर काहीतरी चुकतंय. हि इंटरनेट addiction कडे जाणारी आपली पहिली पायरी असू शकते असे म्हणावे लागेल. नोटिफिकेशन्स न येताही वारंवार मोबाईल चेक करणे, चेक न केला तर अस्वस्थ होणे, किंवा मनात सारखा विचार सुरू असणे की किती लाईक मिळाल्या असतील? त्याचा रिप्लाय आला असेल का? माझा पोस्ट वर काय काय कॉमेंट आल्या असतील? किती शेयरिंग झाल्या? वगैरे वगैरे. आणि या सगळ्यामुळे मग मानसिक ताण निर्माण होतो. तणावामुळे एकाग्रता कमी होते, कामे बिघडतात, आपलयाला निराश वाटायला लागतं, आपल्या वागण्यातही बदल होतात. म्हणूनच इंटरनेट addiction बद्दल आता सतर्क होणे आवश्यक आहे.
लहान मुलं हे आपल्या आजूबाजूला जे घडतंय तेच शिकत असतात. आई वडील हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आई-वडील मोबाईल सतत वापरतात म्हणजे मोबाईल हे एक खेळणं आहे, ते वापरावं लागतं असं मुलं समजतात व शिकतात. अगदी एक वर्षाच्या मुलापासून, मोबाईल मुलांच्या हातात पडतो. बाळ लहान असताना त्याला जेवण भरवण्यासाठी, तो शांत राहण्यासाठी मोबाईलवर गाणे लावणे, मोबाईल खेळायला देणे, इथून सुरुवात होते. थोडावेळ जर मोबाईल त्यांच्या हातून काढून घेतला, तर आजकालची मुलं आरडाओरडा करायला लागतात. रुसून बसतात, हट्ट करतात आणि आपण ऐकलेच नाही तर काही मुलं तर आईवडिलांना मरायलाही मागे पुढे पाहत नाहीत. काहींचा घरात तर मुलं सरळ आई वडिलांना “मम्मा मला बोर होतंय मोबाईल दे..” अस हक्कने मागतात.
आजकाल धकाधकीच्या जीवनात, आई वाडीलनाही मुलांशी खेळायला वेळ राहिला नाही, मग त्यांनाही मोबाईल देणे हाच एक चांगला पर्याय वाटतो. ‘मुलं खेळतात कि मोबाईल वर, त्यांचा विकास होतोय’ असंच वाटत आहे आजकालच्या पालकांना. घरात आजी आजोबा नाहीत त्यामुळे तर हे मोबाईल वर अवलंबून राहनं हे सर्वसामान्य झालं आहे. काही पालक तर ‘माझा मुलगा इंटरनेट वापरतो’ या वर फार खुश असतात, पण तो इंटरनेटवर काय पाहतो, तुम्ही नसताना काय पहिले वगैरे हिस्टरी चेक करता का? मुलं मोबाईल गेम मध्ये पहिल्या नंबर वर असतील पण अभ्यासात मात्र काही काळानंतर घट होणार आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे. जपान मध्ये आणि इतर बऱ्याच ठिकाणी इंटरनेट आणि मुलांचा अभ्यास यावर वारंवार संशोधन झाले आहे. या संशोधनाचा निकाल त्याकाळी थक्क करणारा होता. त्या संशोधनात मोबाईल वर अभ्यास शिकलेली मुले आणि पेन्सिल पेपर घेऊन शिकलेली मुले यामध्ये तुलना करण्यात आली. आणि असे निदर्शनास आले कि मोबाईल वर शिकलेली मुले हे फार चंचल होती, ते एकाग्र राहू शकत नव्हती, तसेच ते शिकवलेला अभ्यास विसरले होते. तर पेपर पेन्सिल वर शिकलेली मुले एकाग्रतेने सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. एकंदरीत मोबाईल हा मुलांचा बुद्धिमत्तेवर हानिकारक परिणाम करत आहे व बुद्धीची क्षमताही कमी करतो आहे हे सिध्द झाले.
आमच्याकडे असे बरेच पालक, मुलं आधीपेक्षा अभ्यासात घसरली म्हणून तक्रार घेऊन येतात. खोलात जाऊन विचारलं कि लक्षात येतं कि बऱ्याच केसेस मध्ये मोबाईल हेच कारण असतं. काही मुलं तर वागण्यात सुद्धा अतिशय हट्टी, रागीट, शिघ्रकोपि, वेंधळे किंवा बे जबाबदार बनतात. आजकाल सोशल मीडिया म्हणजेच व्हाट्स अँप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या साईट वर किशोर वयीन मुलं फोटो अपलोड करतात. कोणाला किती लाइक मिळाल्या यावर त्या मुलाची स्टेटस (किंमत ) ठरवली जाते. मग मुलांची या साठी स्पर्धा लागते. यामुळे काही किशोर वयीन मुलं डिप्रेशन मध्ये जातात, काहींना न्यूनगंड येतो तर काही आक्रमक प्रवृत्तीचे बनतात.
इंटरनेट ऍडिक्शन हे तीन प्रकारात मोडले जाते. १)सोशल मीडिया ऍडिक्शन, २)विडिओ किंवा इतर मोबाईल गेम ऍडिक्शन, आणि ३)सर्फिंग ऍडिक्शन म्हणजे इंटरनेट वर माहिती गोळा करण्याचं व्यसन. हे मोठ्या व्यक्तीला जस दारूचं, पत्यांचं, सट्टा लावण्याचं, जुगारीचं व्यसन लागत तसंच हे इंटरनेटचे ऍडिक्शन आहे. अगदी त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप वाढत जातं.
जुन्या काळात मोबाईल नसताना मुलं शेजारच्या मुलांशी खेळायची, गप्पा गाणी घरोघरी रंगायचे, बोर होणं काय असतं हे मुलांना माहित नव्हतं. मोबाईल नसतानाही मुलं चांगलं खात होती. आता मोबाइल मुळे हे एकटेपण आलाय, मित्र हरवलेत, नाते संबंध हरवलेत आणि मुलांचा बाबतीत मुख्य म्हणजे ते इंटरनेट वर अवलंबित होतं चाललेत. मग आपण मोबाईल बद्दल आणि इंटरनेट बद्दल शिस्त पाळायला नको का? आपण नियंत्रण ठेवले तर मुलेही नियंत्रण शिकतील.
एकदा का हे मोबाईल च किंवा इंटरनेट च किंवा गेमिंग च व्यसन लागलं, ते पुन्हा नीट करणं कठीण होऊन जातं. त्यांना खूप दिवस थेरपी द्यावी लागते. मुलांसोबत पालकांनाही थेरपी व समुपदेशन द्यावे लागते. संपूर्ण उपचाराला काही महिने तरी लागतात. त्यानंतरही इंटरनेट वापरण्यासाठी काही नियम पाळणे, शिस्त पाळणे, आवश्यक असते. उपचार वेळेत केला, थेरेपी व समुपदेशन / कॉउन्सेलिंग वेळेत सुरू केल, तर गोळ्यांची आवश्यकता नसते. नाहीतर कधी कधी लहान मुलांना सुद्धा गोळ्या सुरु कराव्या लागतात. म्हणूनच पालकहो जागृत व्हा. तुमचा घरात किंवा आजूबाजूला अशी इंटरनेट चा व्यसनात अडकलेले मुलं असतील तर एकदा जवळचा मानसिक आरोग्य केंद्रात, किंवा मुलांचा मानसोपचार केंद्रात तपासणी करून घ्या.
लहान मुलांचं मन घडताना त्यावर योग्य वेळेत योग्य संस्कार करणं आवश्यक आहे. मुलांच्या आयुष्याला आपण पालक प्रत्येक पायरीवर वळण लावत असतो. जर जागृत नाही राहिले तर, मुलांचं आयुष्य कधी आणि कसं बिघडत गेलं हे कळणार सुद्धा नाही…