चिंतेचे चिंतन ( Anxiety and Worry )
चिता चिंता समानास्ति !
बिंदुमात्र विशेषता !!
सजीवं दहते चिंता !
निर्जीवं दहते चिता !!
शालेय जीवनातील संस्कृत या विषयामधील हा श्लोक त्यावेळेस त्याचा शब्दश: अर्थ कळाला होता (हो पाठांतरही केले होते). पण आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना त्याची दाहकता कळते आहे. आणि सर्व सामान्यांना या विषयाशी अवगत करावयाची इच्छा यासाठी हा लेखन-प्रपंच.
चिंता आधुनिक मानवाच्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य भाग. प्रत्येकजण त्याच्या आयुष्यामध्ये कधीतरी या चिंतेचा शिकार झालेला असतो. उदा. मार्च एन्ड आहे टार्गेट पूर्ण करण्याची काळजी. परीक्षेला थोडेच दिवस उरलेत, अजुन अभ्यास झाल्यासारखाच वाटत नाही, कामावर गेलेला मुलगा घरी यायला उशीर झाला, आर्थिक विवंचना, नात्यांमधला दुरावा.
चिंतेचे चिंतन करताना एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहीजे, ती म्हणजे चिंता व भीती यांमधील फरक. संकट किंवा अडचण जेव्हा समोर उभी राहते तेंव्हा आपल्याला वाटते ती भीती. पण आपल्यावर काहीतरी संकट कोसळणार असे उगाचच वाटत राहणे म्हणजे चिंता.
वर म्हंटल्या प्रमाणे चिंता हा आधुनिक मानवाच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य पण अतिशय आवश्यक असा भाग आहे.
सर्वच चिंता वाईट नसते उलट योग्य प्रमाणातील चिंता माणसाला कार्यप्रवण बनवते, स्वाभाविक चिंता सावधानतेचा इशारा देते.
आयुष्यातला तोचतोचपणा घालवण्यासाठी आपणहुन आपण कधी कधी चिंतेला आमंत्रण देतो, जसे की, रहाठ पाळण्यात बसणे, साहसी खेळ (Adventurous Sports) खेळणे, हॉरर फिल्म्स पाहणे, रहस्यमय गोष्टी वाचणे. ह्यां कृतींमध्ये खुप मज्जा असली तरी चिंता हे एक महत्वाचे अंग आहे.
कुठल्याही गोष्टीच्या कारणांचा विचार करताना मानसिक आरोग्यात बायो-सायको-सोशल (Bio-Psycho-Social) अप्रोच प्रमाण मानतात.
पहिला घटक, Biological म्हणजे जनुकिय किंवा जैविक. “खाण तशी माती” ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजे स्वभावाचा थोडासा भाग आई-वडिलांकडून आलेला असतो.
दुसरा म्हणजे सायको-सोशल (Psycho-Social), स्वस्थ मानसिक व्यक्तिमत्वाची वाढ ही बऱ्याच अंशी लहानपणी मिळणाऱ्या वागणुकीवर अवलंबुन असते. लहानपणी मिळालेले पोषक वातावरण, जसे की प्रेम, स्वातंत्र्य, सुरक्षा, प्रोत्साहन आणि आधार चांगले व्यक्तिमत्व बनवण्यात मोलाची भुमिका बजावतात. याउलट वातावरण, हानिकारक ठरते.
काही गोष्टी समाजामध्ये शिकवल्या जातात, काही गोष्टी मुले अनुकरणातुन शिकतात. खंबीर, मनमिळाऊ आणि धीट पालक मुलांना तसेच बनवतात किंवा काही चिंतातुर पालक मुलांनाही भित्रे बनवतात.
अनिश्चितता हा जगाचा नियमच आहे. पुढे अथवा भविष्यात काय होणार आहे हे कोणीच सांगु शकत नाही एवढे जरी कळाले तरी बरीच अनावश्यक चिंता कमी होईल.
सर्वात महत्वाचे पण तितकेसे लक्ष्य न दिले गेलेले चिंतेचे कारण म्हणजे अंतर्मनातील संघर्ष. व्यक्तीगत स्वार्थ व सद्सदविवेकबुद्धी मधील संघर्ष हे चिंतेचे एक महत्वाचे कारण. दुसरे म्हणजे आपण स्वतःकडून केलेल्या अवाजवी अपेक्षा, त्या पुर्ण नाही करू शकलो हेही एक कारण बनुन जाते.
चिंते विरुद्धचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हा निरोगी स्वःप्रतिमेचे प्रतिक आहे.
आपण जशी दुसऱ्याची पारख करत असतो, तशीच स्वतः ची करत असतो. यालाच स्व-मुल्यमापन म्हणतात. आपल्याच असलेल्या चांगल्या गुणांचा सार्थ अभिमान आणि असलेल्या कमतरतांची योग्य जाणीव. या गोष्टी आत्मविश्वासासाठी आवश्यक आहेत.
तर मग स्व-मुल्यमापन करा, आत्मविश्वास मिळवा, चिंतेची कारणे शोधा आणि चिंतेचे योग्य व्यवस्थापन करा (कृती सर्वात महत्वाची). असे करणे, ही तुमची चांगले मानसिक आरोग्य मिळवण्याच्या दृष्टीने खुप मोठी झेप असेल.