स्वत्व हरवताना

स्वत्व हरवताना

स्वत्व हरवताना

जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने.

आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा म्हणजे आपल्या आठवणी. आपल्या जडण-घडणे पासून अगदी शेवटपर्यंत अगदी आपल्या हक्काची गोष्ट असतात त्या. चांगल्या-वाईट, हसऱ्या-दुखऱ्या, नवीन-जुन्या, हव्या असलेल्या- नको असलेल्या अगदी कशा ही असल्या तरी जपलेल्या आणि म्हणूनच आपले स्वत्व बनलेल्या. माझ्या मते आपण कोण असतो तर “आपण आपल्या आठवणींचा संग्रह असतो.”

पण अशा या आठवणींना घरघर लागली तर ? आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर ? आपलेच घर आपल्याला रोज अनोळखी वाटू लागले तर ? आपलीच हक्काची माणसे लक्षात नसतील येत तर ? आपल्या रोजच्याच गोष्टी ज्या आपण अगदी सहज करतो त्या करता नाही आल्या तर ? बोलायचे आहे पण शब्दच आठवत नसतील तर ? आपल्याही लक्षात येतंय की आता आपण विसरायला लागलोय तर? असे खरंच होते आणि त्यातुन त्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अमुलाग्र बदल होतात. हे असे होणे किंवा याची लक्षणे दिसणे म्हणजेच डीमेंशिया किंवा स्मृतिभ्रंश हा आजार होय.

खरंतर स्मृतिभ्रंश हे नाव चुकीचे पडलेले आहे, या नावमध्ये फक्त शाब्दिक स्मृतींना जास्त महत्व दिलेले आहे. पण या आजारामध्ये शाब्दिक स्मृती बरोबरच कृतींच्या आठवणी (coordination, muscle memory) या सुद्धा पुसट होत जातात. पेस्ट ब्रशला लावून दात घासणे किंवा स्वतःचा भांग कंगव्याने पाडणे या अगदी कधी आपल्या लक्षात ही न येणाऱ्या कृती सुद्धा या आजारात पुढे पुढे अवघड होत जातात. सांगायचा मुद्दा फक्त स्मृती नाही तर दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी आवश्यकता असलेल्या वेगवेगळ्या क्षमता यात कमी कमी होत जातात.

आज जागतिक अल्झायमर दिवस. हा दरवर्षी 21 सप्टेंबर या दिवशी, या आणि अशा प्रकारच्या आजारांविषयी जनजागृती व्हावी या हेतूने साजरा केला जातो. स्मृती जाणे आणि त्याबरोबर होणारे मेंदूतील बदल डॉ. अलोईस अल्झायमर या जर्मन मनोविकारतज्ञाने पहिल्यांदा जगासमोर मांडले त्यामुळे या आजाराला त्यांचे नाव देण्यात आले. जसे जसे संशोधन पुढे गेले तसे याप्रकरच्या आजारांमध्ये भर पडत गेली आणि अशी लक्षणे असणाऱ्या आजारांना डिमेन्शिया या मोठ्या गटात सामील केले गेले.

हा आजार बरेच दिवस दुर्लक्षित राहण्याची कारणे म्हणजे
1) आपण याला वयानुसार येणारा विसरभोळेपणा समजतो.
2) हा अगदी हळू हळू हात पाय पसरवणारा आजार आहे त्यामुळे ती व्यक्ती आजारी आहे हे लक्षात येत नाही.
3) उतारवयातील इतर शारीरिक आजारांची लक्षणे असतील असे समजले जाते.
4) उतारवयातील आजार सहन करण्याची प्रवृत्ती.
5) या आजाराविषयी माहिती नसणे.

जेव्हा आम्ही मनोविकारतज्ञ स्मृतिभ्रंश हा शब्द वापरतो त्यावेळी ते म्हणतात, “असे काही नाही जुने सगळे ठणठणीत लक्षात आहे.” इथे नातेवाईकांनी लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की, या आजारांमध्ये आठवणी तयार होण्याची प्रक्रिया बिघडलेली असते, जुन्या आठवणी चांगल्याच असतात. त्यामुळे सकाळी काय खाल्ले हे त्या विसरून जातात पण कधी रिटायर्ड झाल्या अगदी तारीख वेळेसह सांगतील. आजार खुप वाढला तर मात्र जुन्या आठवणी सुद्धा विसरल्या जातात. लक्षात घ्या हा सातत्याने वाढत जाणारा आजार आहे आणि एकदा झालेले मेंदूचे नुकसान भरून येणारे नसते. आपण वेळीच घेतलेली औषधांची मदत त्या व्यक्तीचे आयुष्य सुखकर करते आणि आजाराच्या वाढीचा वेग कमी करते.

वेळीच घेतलेली तज्ञांची मदत रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे जीवन सुसह्य करणारी ठरते. बऱ्याच वेळा काही इतर आजारांमुळे सुद्धा अशी लक्षणे दिसतात त्यावेळी काही रक्त तपासण्यांची आणि मेंदूच्या इमेजिंग ची सुद्धा गरज पडू शकते. निदान पक्के झाल्यानंतर मात्र औषधे नियमित घेतली पाहिजेत. औषधे नातेवायिकांनी द्यावी असे आम्ही आग्रहाने सांगतो कारण रुग्ण त्याच्या आजारामुळे बऱ्याचवेळा चुकीची आणि चुकीच्या पद्धतीने औषधे घेतो. ‘Still Alice’ आणि मराठीमध्ये ‘अस्तु’ या चित्रपटांमध्ये या आजाराचे सुंदर सादरीकरण केलेले आहे आवश्य पहा. इतरांना ही वेळीच माहिती पुरवा.

#मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड.
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड,
नाशिक.
0253 2315050