जया अंगी मोठेपण….
सध्याच्या काळात सोशल मीडिया वर जेव्हा रोज विज्ञानाला आणि वैज्ञानिक विचार पद्धतीला मारलेले खडे पाहतो ना तेव्हा खरच वाईट वाटते. भावनिक आवाहन आणि काहीतरी आतर्किक तर्क यांची छान सरमिसळ केलेली असते. मग असे मेसेज वाचणाऱ्यांना ते आवडते कारण त्यात भावनेला आवाहन असते, कोणालातरी शिव्या घातलेल्या असतात. आणि त्याला 'फॉरवोर्ड्स मुल्य' असते म्हणजे अशी पोस्ट पाठवल्याने त्या व्यक्तीला बाकीची लोकं लक्षात ठेवणार असतात त्यामुळे वनव्यापेक्षा जास्त वेगाने अशा काही पोस्ट फिरतात. हे 'फॉरवोर्ड्स मुल्य' ती पोस्ट फक्त वैज्ञानिक किंवा शास्त्रीय असेल तर प्रचंड कमी असते कारण ती पोस्ट लोकांसाठी बोरिंग असते.
आपल्या रोजच्या जीवनाच्या लढाईत घायकुतीला आलेला लोकांना मनोरंजन सोडुन दुसरे काहीही नको असते त्यामुळे शास्त्रीय पोस्ट लिहिल्या जात नाहीत असे नाही पण त्या तेवढ्या वाचल्या जात नाहीत. वाचल्या तरी त्यातुन लेखकाला अभिप्रेत असलेला संदेश लोकांपर्यंत जातोय की, आधीच्याच चुकीच्या माहितीची भलामण होते हे कोडे अशा पोस्ट लिहिणाऱ्या लेखकाला कळतच नाही. पण म्हणून विज्ञानावरच्या पोस्ट लिहिल्या नाही पाहिजे, असे थोडीच आहे.
विज्ञान कसे विचार करते ? एखादे कोडे कसे सोडवते ? त्यातुन जी माहिती मिळते तिला कसे वापरते ? आणि त्या मिळालेल्या माहितीनुसार पुढचा विचार कसा करते ? आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटनांमध्ये कसे विज्ञान असते ? आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपल्याला समजलेल्या असतात का ? एखादी गोष्ट समजुन घेण्यातला शास्त्रज्ञांचा प्रवास कसा असतो ? याचे उदाहरण घेऊ या.
आपण बर्फावरून पाय घसरून पडतो. जे जे बर्फावर गेले आहेत त्या सगळ्यांना हा अनुभव आहे. तर असाच एक गण्या बर्फावरून पाय घसरून पडलाय त्यामुळे पाय मोडलाय आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलाय. त्याला कोणी विचारले की, "कसे काय पडलात ?" "पाय घसरला आणि पडलो." गण्या एकदम क्षणाचा विलंब न लावता उत्तर देतो, बरोबर ना. मग कोणी नातेवाईक असेल तर, "अरे गण्या जरा हात पाय हलवत जा की, घरी नुसता बसुन असतो, म्हणुन ताकद नाही आणि पडतो मग असा झाले ना कल्याण पायाचे आता." कोणी बेस्ट फ्रेंड असेल तर, "कमी घ्यायची ना भो, ट्रिप ला गेलास की पार मागचा बॅक लॉग वसुल करतोस लेका तु. म्हणुनच पडला असशील." असे आणि आपल्याला पटतील असे बरेच कारणे देता येतील. हे झाले सोशल मीडिया वर फिरवण्याचे आणि फॉरवोर्ड्स मुल्य असणारी कारणे. आपल्याला पटतात देखील, यात काय चुकीचे आहे ? असा प्रश्नही कोणी विचारतील. यातही विज्ञान आहे पण वरील स्पष्टीकरणावरून एखादा तंदुरुस्त आणि कुठलेही रंगीत औषध न घेतलेला गिर्यारोहक बर्फावरून पाय घसरून का पडतो ? याचे उत्तर मिळत नाही.
विज्ञान आणि वैज्ञानिक विचार अशा घटनेकडे वेगळ्या अँगल ने पाहते. अगदी आपण अभ्यास करणारी मंडळी परग्रहावरून आलो आहोत आणि इथली ही घडलेली घटना आपल्याला कळत नाहीये असे ग्राह्य धरले जाते. मग पहिला प्रश्न पडतो, पाय मोडल्यावर हॉस्पिटलमध्ये का जायचे ? जर पाय मोडलेला आहे तर गण्या हॉस्पिटलमध्ये कसा पोहोचला ? (कारण गण्याच्या मित्रांनी अँबुलन्स बोलावली आणि त्याला ऍडमिट केला. पण मित्रांनीच का ऍडमिट केला ? कारण सुखदुःखात एकत्र राहणाऱ्यांना मित्र म्हंटले जाते. अँबुलन्सच का बोलावली ? कारण त्यामध्ये पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली जाते.) ह्या आपल्याला लगेच पटणाऱ्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. यालाच वैज्ञानिक भाषेत गृहीतके म्हणतात, कारण याशिवाय आपण प्रत्येक गोष्टीचे कारण शोधत बसू आणि जास्त गोंधळून जाऊ. (Asking why to each and everything is not scientific in search of specific question.) असा वेगळ्या अँगल ने विचार करायला लागल्यावर कळते ना की साधी घटना, पण किती वेगळ्या अँगल ने विज्ञानाला पहावी लागते आणि आपण यामध्ये जेवढा जास्त विचार करू तेव्हढे जास्त प्रश्न आपल्याला पडतील.
याचीच उत्तरे शोधत बसलो तर मुळ प्रश्न बाजुलाच राहील. मग गण्या बर्फावरून का पडला ? निसरड्या जागेवरून आपण पडतो कारण ग्रीप मिळत नाही (Friction force). हे समजते पण बर्फ तर कडक आहे. जर जमिनीवरून (कडक जागेवरून) आपण पडत नाही तर मग बर्फावरून का पडतो ? कारण बर्फावर दाब दिला की तो तात्पुरता वितळतो, आणि निसरडा बनतो. पण मग फक्त बर्फच का वितळतो ? बाकीच्या गोष्टी का नाही ? अगदी काही गोष्टींना तडे जातात दाब दिल्यावर पण त्या वितळत नाहीत, असे का? (पाण्याचे जेव्हा बर्फ होते तेव्हा ते प्रसरण पावते. दाब दिला की तात्पुरते पाणी होते. यामुळेच तर आपण स्केटिंग करू शकतो.) आपण येथेच थांबु शकतो पण जर आणखी पुढे विचार करायचाच झाला तर मग फक्त पाणीच गोठल्यावर प्रसरण पावते की आणखी वेगळी मुलद्रव्ये अशी आहेत ? याचा शोध चालु होतो. माझ्या मते मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केलाय. अजुन ट्वीस्ट टाकायचा असेल तर, पाय घसरल्यावर आपण खाली जमिनीवरच का पडतो ? ही एक वेगळीच विचारमालिका सुरू होईल. कुठलाही वैज्ञानिक माहितीचा साठा असा वाढत जातो. त्यामुळे तुमचा ज्ञानाचा किती साठा आहे यानुसार तुम्ही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत असता, हे कृपया लक्षात घ्या. आणि त्यानुसारच या गोष्टी समजावून घेत असता.
विज्ञान समजुन घेताना किंवा समजावून सांगताना बऱ्याच गोष्टी त्याच भाषेमध्ये बोलाव्या लागतात. इतर उदाहरणे वापरून त्या समजावल्याच जाऊ शकत नसतात. आणि त्या तसे सांगण्याचा प्रयत्न करणे ही पण एक शास्त्रीय लेव्हल ला चिटिंग असते, (मी सध्या ती करतोय याचे भान मला आहे.) कारण असे करताना आपण योग्य ती माहिती देण्यापेक्षा शिकणाऱ्याच्या कल्पनाशक्तीवर जास्त विश्वास ठेवलेला असतो. आणि अशा दिलेल्या उदाहरणांमध्ये मुद्दा भरकटने आपल्याला काही नवीन नाही. सगळ्या सोशल मिडिया वर हेच तर चालू असते. विषय काय आहे हेच कळत नाही त्यामुळे भांडणाऱ्यांना भांडल्याचे समाधान मिळते पण त्यातुन काही नवीन शिक्षण होत नाही.
आज मी हेच सांगु इच्छितो की वैज्ञानिक विचार करणे आणि ती माहिती गोळा करणे हे खुप जबाबदारीने आणि अत्युच्च काळजी घेऊन करण्याचे काम आहे. अगदी काही थोडक्या वैज्ञानिक गोष्टींचा वापर करून जर कोणी शोध लावला म्हणत असेल तर त्यावर शंका घेण्यास नक्कीच वाव असतो. परंतु आपल्याकडे सध्या हेच चालू आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीतले स्वयंघोषित एक्स्पर्ट जन्माला आलेत. ते फक्त सायन्स मधले काही शब्द वापरतात आणि स्वतः ला सायइंटिफिक म्हणवून घेतात पण ते तसे नसते, हे आता वेगळे सांगायला नको. आपल्याकडे कोरोनाचा पिक आला की नाही माहीत नाही पण यांच पीक जोरदार आलंय. (सोशल मिडिया एक्स्पर्ट तर कुठलीही तसदी घेत नाहीत, ते स्वयंसिद्ध असतात. कुठलीही गोष्ट त्यांनाच कळालेली असते आणि ते सांगतात तेच बरोबर असते. एखाद्या गोष्टीला दुसरा अँगल असु शकतो हेच यांना मान्य नसते. उदा. आरोग्य, डॉक्टर आणि कोरोना विषयी फिरणाऱ्या पोस्ट आपण पाहू शकता.)
हे असे काहीतरी भावनिक दावे करणारी मंडळी कदाचित बरोबर होतील सुद्धा, मी कदाचित चुकीचा असु शकतो पण सध्या तरी हे दावे विज्ञानाला धरून नाहीत एवढे निश्चित. पण विज्ञानाचा अभ्यास केलेला आणि संशोधन कसे करतात याची जाणीव असलेला मी या गोष्टींकडे बराच साशंक नजरेने पाहत असतो आणि तुम्ही पण पहायला शिकायला हवे हीच इच्छा.
एखादी गोष्ट समजुन घेणे किती प्रचंड अवघड असते हे विज्ञानाला कळाले आहे. एखादा दावा करण्याआधी प्रत्येक गोष्टीची किती काळजीपूर्वक तपासणी होणे गरजेचे आहे. प्रयोगामध्ये किती सहजासहजी चुका होऊ शकतात याची जाणीव विज्ञानाला आहे. त्यामुळे काही चुक झाली तरी विज्ञान खुल्या मनाने त्याचा स्वीकार करते.
हे विज्ञानाचे असे नित्यनूतन असणे हेच मला खुप आवडते. यात कुठला अभिनिवेश नसतो उलट आपल्या क्षुद्रतेची जाणीव पावलोपावली विज्ञानाला असते. सगळ्या नवीन गोष्टींना मोकळीक असते पण याचा अर्थ कुठल्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करावे असा नक्कीच होत नाही. विज्ञान चुक जशी मान्य करते तसे चुकीला चुक म्हणायचे सामर्थ्य पण देते. कुठलीही माहितीतील सत्य समजण्यापूर्वी वरील विज्ञानाच्या नजरेतुन त्या गोष्टी तुम्ही पहाव्या ही विनंती. विज्ञानाच्या अंगावर असलेल्या जबाबदारीमुळे ते कधी कधी संथ गतीने काम करते असे वाटते, पण त्याला पर्याय नसतो. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण." असो ………