वैचारिकतेचा विचार करताना

वैचारिकतेचा विचार करताना

ते शास्त्र असते. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला जर ती पटवून द्यायची असेल तर ‘शास्त्र’ हा शब्द तिला जोडून द्यायचा, काम झालेच म्हणून समजा. कारण एकमेव भारतातील शास्त्र हे असे आहे की त्याच्या चिकित्सेला परवानगी नाही. असे केल्याने शास्राचा अपमान होतो, हे पण शास्रातच लिहिलेले आहे म्हणे. उदाहरण द्यायची गरज नाही ज्याने त्याने आप आपल्या आजूबाजूला थोडेसे चिकित्सेने पाहिले तरी बरीच उदाहरणे दिसतील.

तर अश्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मुलांनी पुढे जाऊन स्वतःच वैचारिक दृष्टिकोन (Critical Thinking) शिकावा अशी आपली अपेक्षा आहे. जी की बऱ्याच वेळा पुर्ण होत नाही. आणि मग सध्या भारतात जो गोंधळ चालू आहे तो तसा का आहे हे समजायला मदत होते. आपण “शब्द प्रामाण्य मानतो”, अरे तसे म्हंटले आहे ना मग असेल बाबा, आपल्याला काय त्याचे. यामुळेच आपल्या बऱ्याच जुन्या अडगळीत जाव्या अश्या प्रथा अजुनही सुरू आहेत. त्याला प्रश्न विचारेल तरी कोण ? आणि एखाद्याने विचारला की त्याला देशद्रोही ठरवायलाही आपण कमी करत नाही.

हे फक्त जुन्या गोष्टींच्या बाबतीत होते असे मुळीच नाहीये. उलट सध्या भारतीयांचा हा गुण सोशल मीडिया मार्केटिंगच्या चांगलाच पथ्यावर पडलाय. कारण चिकित्सा न होताच अगदी थोड्या वेळात कुठलीही गोष्ट लगेच सगळीकडे पोहोचते. खरेतर ती पोहोचावी अशीच योजना असते. यात ही स्वतः चे वैचारिक मत नसलेली मंडळी वापरली जातात आणि ही मंडळी आलेला मेसेज कुठलाही विचार न करता पुढे पाठवायचे काम करतात. आणि जेव्हा अश्या गोष्टींचा पुरेसा भडिमार होतो, भली भली मंडळी सुद्धा त्याची शिकार होतात. वैचारिकता (Critical Thinking) आणि हुद्दा किंवा शिक्षण याचा दुरान्वये ही सबंध नसतो. उलट नंतर अशी मत बनवली गेलेली मंडळी त्या मतांचे आपली बुद्धी वापरून समर्थन करतात. आहे की नाही कमाल, सुरुवातीला सहज, गंमत जम्मत म्हणून वाचलेल्या गोष्टी आपले मत बनवत आहेत आणि आपला वापर करून घेतला जातोय हेच ह्या मंडळींना कळत नाही.

कोणी यांना त्यांच्या बनलेल्या मताविरुद्ध काही सांगायला गेले की ही मंडळी परत उद्देश्यपूर्ण पाठवलेल्या माहितीची (Intentionally dissemination of wrong info) मदत घेऊन, खूप विवाद घालतात. खरेतर सगळे विवाद उद्देशहीन असतात. “I learned very early the difference between knowing the name of something and knowing something.”

Richard P. Feynman. यात भल्या भल्या मंडळींचा गोंधळ उडतो, आणि गुंता वाढतच जातो. कारण विषयाची माहिती नसताना ऐकीव महितीवरती आपण भांडत बसतो.

“We live in a society exquisitely dependent on science and technology, in which hardly anyone knows anything about science and technology.” Carl Sagan

हे खरे आपले दुर्दैव आहे. मग आपण हेच सायन्स आणि तंत्रज्ञान वापरून आधुनिक युगातील अंधश्रद्धा पुढे पाठवत राहतो. उदा. हा मेसेज पुढे पाठवा तुमची बॅटरी 100 % चार्ज होईल. हा 11 जणांना पाठवा काहीतरी चांगले होईल. हा 5 ग्रुप मध्ये पाठवा स्मार्टफोन मिळेल…. वगैरे वगैरे. खरंच कधीतरी त्या पाठवणाऱ्याच्या बुद्धिमत्तेवरती शंका यावी, इतके फालतू मेसेज असतात.

बरे यात एक गट असाही असतो जो वरवर चिकित्सेचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी त्यांनी केंम्ब्रिज ऍनालिटीका विषयी माहिती आवर्जून वाचावी. ही अशी उत्सुकता आणि फक्त वरवरची माहिती घेणे हेच त्यांचे कच्चे दुवे म्हणून वापरले जात आहेत. पटत नाही ना ! पण हे असेच आहे.

आपल्या विचार न करता वागण्याच्या सवयीमुळे आपले प्रचंड नुकसान होते आहे. आपल्या आयुष्यातील आपले प्राधान्यक्रम (Priorities) ठरवण्यामध्ये सुद्धा क्रिटिकल थिंकिंग चा खूप मोठा वाटा आहे, तर येथुन पुढे विचार करा आणि त्यानुसार वागा. आपल्याला काय करायचे आहे हेच माहिती नसल्यामुळे आपण नाहक आकर्षक आणि भावनिक माहितीच्या माऱ्याला बळी पडतो. जसे की ऑनलाईन सेल आणि शॉपिंग मॉल. आपण काहीही न ठरवता जातो आणि छान प्रकारे बरीचशी नको असलेल्या गोष्टी खरेदी करून घेऊन येतो. या सर्व आणि अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपली वैचारिक पणे निर्णय घेण्याची क्षमता कमी पडते आहे. आणि जाहिरातकर्ते त्याचा त्यांच्या फायद्याकरता वापर करून घेत आहेत.

हे सगळे विचार न करता, करून आल्यावर येतो तो स्ट्रेस. मग स्ट्रेस मॅनेजमेंटच्या जाहिरातींना बळी पडायला परत मोकळे (याविषयी नंतर). कृतीच्या आधी विचार करायला शिका आणि आपले आयुष्य आपणच बदला. चालत आले आहे, म्हणून करू नका. भडिमाराला बळी पडू नका. क्रिटिकल थिंकिंग शिका आणि आयुष्य बदला. प्रश्न विचारायला घाबरू नका, माहितीची विश्वासार्हता ओळखायला शिका, तरच या माहितीच्या महापुरात टिकाल.

#मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड,
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड
नाशिक.