दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!! ( When Liver Talks to Deaddiction specialist )
दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!!
नेहमीसारखे दारू पिणाऱ्या व्यक्तींबरोबर व्यसनमुक्तीचे काम करत असताना वरील विचार डोक्यात चमकून गेला.
लिव्हर आणि डॉक्टर यांमधील संवाद असा काहीसा असेल.
लिव्हर : “ओ डॉक्टर सांगाना याला, तुझा खेळ होतो म्हणा पण माझा जीव जातो.”
डॉक्टर : “अरे हो रे बाबा! कळतय मला तुझे दुःख, चल आज तू लिव्हर आणि मी डॉक्टर आपण दोघे मिळून प्रयत्न करूया.”
लिव्हर : “खरंच कळत नाहीये का याला ? अशीच शंका येतेय मला सगळ्यात आधी.”
डॉक्टर : “नाही रे बाबा, नाहीच कळत याला. ह्याला कारण पण तूच आहेस म्हणा, कारण तुझं नुकसान झाले तरी ते नुकसान भरून काढायची तुझी ताकद तुझ्याच अंगलट येतेय.”
लिवर : “मान्य हो शरीरामधला मी असा एकमेव अवयव आहे की जो स्वतःचे नुकसान स्वतः भरून काढू शकतो. पण ह्याला पण मर्यादा आहेत ना ? हे सांगा की त्याला डॉक्टर.”
डॉक्टर : “सांगतो बाबा सांगतो. पण त्याला विचारले किती पितो तर म्हणतो फक्त एक किंवा दोन क्वार्टर.”
लिव्हर : “अरे बापरे! तरीच मी म्हणतोय, आजकाल एवढा का थकतोय मी ? त्याला सांगा बाबा तु जेव्हा एक क्वार्टर पितो तेव्हा मला सहा तास ओव्हरटाइम करावा लागतो आधीच मी आहे शरीराचा ओवरलोडेड कारखाना त्यात अजुन हे दारू शरीराबाहेर काढायचे एक्सट्रा काम, जीव अगदी नकोसा होऊन जातो.”
डॉक्टर : “पण तु म्हणतो आहेस हे त्याला खरंच कळत नाही,
कारण दारू पिऊन हा जातो गुंगून. त्याला वाटते जे काही होतंय ते फक्त चांगलेच होतंय. मस्त मज्जा येते, मित्रांबरोबर एन्जॉय होतो.”
लिव्हर : “कसला डोंबलाचा एन्जॉय. इथे कणाकणाने मरायला लागलोय मी आता. मध्ये कावीळ करून घाबरवायचा प्रयत्न केला होता, पण पठठ्याने थोडे दिवस आराम दिला आणि परत कामाला लावले. आता तर माझे डोकेच चालत नाहीये.”
डॉक्टर : “आपण त्याला तुझ्या तपासणीचे रिपोर्ट काढून दाखवुया.”
लिव्हर : “लिव्हर फंक्शन टेस्ट आणि सोनोग्राफी ना? कराच एकदा. आधी सांगितले होते डॉक्टरांनी, पण हा हिरो पळून गेला होता त्यावेळेस.”
डॉक्टर : “त्याला हेच समजावुन सांगतो आता की. बाबा तुझे लिव्हर थकले आहे. वेळीच तु जर दारू बंद केली नाहीस ना, तर मग त्याला सुज यायला लागेल, तुला रक्ताच्या उलट्या होणार, काळ्या रंगाची संडास होणार, हातापायांना मुंग्या येणार, परत परत कावीळ होणार. आणि तरी देखील तु दारू नाही सोडलीस तर मग तुझे लिव्हर राजीनामा देणार.”
लिव्हर : “हो हो राजीनामाच देणार मी ! मग बस म्हणा बोंबलत. मी काय कोणी राजकीय नेता नाही, राजीनामा मागे घ्यायला, माझा पर्मनंट राजीनामा असतो म्हणावे.”
डॉक्टर : “तु ज्याला राजीनामा म्हणतो आहेस ना, त्याला आम्ही लिव्हर सिऱ्होसीस म्हणतो, एकदा का हे चालू झाले ना, मग परत काहीच उपचार नाही, एव्हढेच काय नंतर दारू सोडली तरी उपयोग नाही. मग दोनच पर्याय उरतात लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा हालहाल होऊन मरणे. लिव्हर ट्रान्सप्लांट काय सगळ्यांनाच शक्य नाही. हे सगळे आम्हां डॉक्टरांना कळते रे पण त्यांना सांगुन पण जेव्हा कळत नाही ना! मग आम्हीं डॉक्टर लोक वेगवेगळ्या उदाहरणातून हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो, अगदी मनापासून आणि अशी प्रामाणिक अपेक्षा करतो की याने दारू सोडावी. पण निर्णय त्या दारू पिणाऱ्याला घ्यायचा असतो. कारण निर्णय लादता येतंच नसतो तो स्वयंस्फूर्तीने घेण्याची गोष्ट आहे. आणि बरेच लोक घेतात सुद्धा.”
लिव्हर : “अरे वा!! कल्पनेत सुद्धा किती छान वाटते आहे. की मला विनाकारण जास्त न आवडणारे काम करावे लागणार नाही. धन्यवाद डॉक्टर मला समजुन घेतल्याबद्दल. आता मी पळतो काल रात्री पिलेली दारू अजुन पेंडिंग आहे.”
डॉक्टर : “हो चलो भेटू परत. चांगला होऊन येशील पुढच्या वेळेस अशी अपेक्षा करतो. हो अपेक्षाच कारण तेव्हढेच करू शकतो डॉक्टर ह्या नात्याने.” आणि अचानक पुढच्या पेशंटने मला दार वाजवुन ह्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर काढले.
मी मनातल्या मनात लिव्हर ला म्हणालो, “नशीबवान आहेस लेका !! कमीत कमी थकल्यावर तु काम तरी बंद करू शकतोस. आतमध्ये येऊन तुला कोणी मारणार तर नाहीये. कारण कमीत कमी त्यांना तेव्हढे तरी कळते की लिव्हर हा शरीराचा खुप महत्वाचा अवयव आहे. डॉक्टरांच्या नशिबी तर हे पण नाही…..”