ओसीडी ( Obsessive Compulsive Disorder )
आज मी एका ”मानसिक म्हणजेच मेंदूच्या आजाराबद्दल” माहिती देणार आहे. पण हे करत असताना जर एखादा त्रासदायक विचार परत परत माझ्या डोक्यात येत असेल आणि त्यामुळे मी सलग विचार करू शकत नसेल तर. तो विचार माझाच आहे हे मला माहिती आहे, पण मला तसा विचार करायचाच नाहीये. मी कितीही प्रयत्न केले तरी त्या विचारापासून माझी सुटकाच होत नाहीये. असे झाले तर, एकतर माझी चिडचिड होईल आणि कदाचित रडायला सुद्धा होईल. बरोबर ना. अगदी असेच होते एका आजारामध्ये.
उच्च शिक्षित २८ वर्षांची शिक्षिका म्हणून काम करणारी एक मुलगी तिच्या आई बरोबर काल भेटायला आलेली. मुलीने काही म्हणायच्या आधीच, आईचा तक्रारींचा पाढा चालु झाला. “आठ महिन्याच्या आधीपर्यंत सगळे व्यवस्थित चालले होते डॉक्टर. आता दिवसातून पन्नास वेळा हात धुते, आठ आठ तास आंघोळ करते. त्यामुळे वडील तिला खुप बोलतात आणि वडील बोलले की ही रडायला लागते. सगळ्यात कहर म्हणजे तिचेच डोळ्यातले पाणी आंघोळीच्या टब मध्ये पडले तरी, ते सगळे पाणी ओतून देते आणि परत रडत रडत नव्याने आंघोळ करते. असे मागच्या दोन महिन्यापासून चालु आहे. आता अगदीच सहन होत नाहीये. शेवटी शिकलेली आहे म्हणून तिनेच तुमची माहिती काढली आणि आम्ही आज तुम्हांला भेटायला आलोय. आम्ही तर तिला समजावून सांगितले, रागावून झाले. पण काही फरक नाही एवढी शिकलेली मुलगी अशी का वागायला लागली ? आता तर तिला स्थळे सुद्धा येत आहेत पाहायला. घरात नुसता हाहाकार झालाय.”
अगदी पोटतिडकीने ती आई सांगत होती, मुलीला समजुन घेत असल्याचे सांगत होती, तिला जमेल तशी मदत करत होती. पण खरेतर ती मनाने हादरली होती, हे असे काहीतरी अगम्य झाले की माणसे बाहेरचे पाहून येतात. तेही त्यांचे करून झाले होते. पण कारणही कळेना, असे का वागतीये तेही कळेना आणि जो उपचार झाला त्याला गुणही येईना, अश्या विचित्र अडचणीत ती सापडली होती. वरून मुलीचे वडील अपंग म्हणजे सगळी जबाबदारी आईवरच. त्या वडिलांची काळजी हिला घ्यावी लागली, म्हणून हिच्या मनात किळस तयार झाली असावी आणि ही असे वागत असावी. असा सरळ पण चुकीचा निष्कर्ष काढूनही ती मोकळी झाली होती.
असे रुग्ण आणि त्यांचे भांबावलेले नातलग जेव्हा येतात ना. तेव्हा मानसिक आजार किती दुर्लक्षित आहेत याची झलक पाहायला मिळते. उच्चशिक्षित शिक्षिका आणि तिचे बऱ्यापैकी शिकलेले नातलग यांची ही अवस्था तर, बाकीच्यांची काय अवस्था असेल ? यातुनच ह्या आजाराविषयी लिहावेसे वाटले आणि लिहितोय.
याला आम्ही ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डीसऑर्डर (Obsessive Compulsive Disorder) असे म्हणतो. यालाच सिक्रेटीव्ह डीसऑर्डर (Secretive) असेही म्हणतात
कारण यामध्ये आजार लपवुन ठेवण्याकडे रुग्णाचा कल असतो. या अश्यामुळे आणि आजाराविषयी असलेल्या अज्ञानामुळे असा आजार झालेले रुग्ण खुप उशीराने आमच्यासारख्या डॉक्टरांकडे येतात. यावरील संशोधन असे दाखवते की साधारण साडे सात वर्ष लागतात, रुग्णाला डॉक्टरांपर्यंत पोहोचायला, तोपर्यंत आजार खुप चिवट झालेला असतो.
शंका कुशंका (Ambivalence) हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. शंका कुशंका कोणाला येत नाहीत, पण काही लोकांमध्ये याचा अतिरेक होतो. याशिवाय दुसरे काही सुचत नाही. विचित्र मनाला न पटणारे विचार त्यांच्या मनात थैमान घालत असतात. हे विचार कितीही प्रयत्न केले तरी ते मनातुन काढून टाकू शकत नाहीत. जेव्हा हे असे अनावश्यक विचारात गुंतलेले लोक, यामुळे त्यांच्या रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत. अश्या मनोविकृतीला ओसीडी “ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डीसऑर्डर” (Obsessive Compulsive Disorder) असे म्हणतात.
विनाकारण येणाऱ्या, मनाला त्रास देणाऱ्या आणि मनात घोळत राहणाऱ्या विचारांना, ‘ऑबसेशन’ असे म्हणतात. ह्या ऑबसेशन्स मध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्यांचे विषय वेगवेगळे असतात. हिंसेशी संबंधित ऑबसेशन मध्ये, माझ्या हातून कोणाला इजा होईल असे भय रुग्णाला वाटते. तर धार्मिक प्रकारांमध्ये देवाबद्दल नको नको ते वाईट विचार येतात. लैंगिक प्रकारांमध्ये सतत लिंग आणि सेक्स यासंबंधीच विचार असतात. माझी एक ग्रामीण भागातील पेशंट आहे, 27 वर्षांची लग्न झालेले, “डॉक्टर! मला सांगताच येत नाही पण आता असह्य झालंय, मला सगळीकडे फक्त आणि फक्त पुरुषी लिंगाचेच विचार येतात, देवाचे नाव घेते, तरी काही फरक पडत नाही. कोणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, एकदा हिम्मत करून नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला तर माझ्यावरच चिडले ते. मी त्यामुळे घराबाहेर निघत नाही, माझे छोटेसे दुकान होते तेथेही जाऊ शकत नाही. मी काहीही केले तरी तेच विचार माझ्या मनात चालू असतात. माझी मलाच किळस यायला लागलीये. का होते आहे असे माझ्याबरोबर. हिला ऑबसेशन्स होते हे वेगळे सांगायची गरज नाही.
आपल्या लेखातील पहिली मुलगी हिला जंतुसंसर्गा बद्दल ऑबसेशन्स आहेत. ती लॅब मध्ये काम करत असताना, एका विषाणू असलेल्या डिश ला तिचा हात लागलेला. आता हे आपल्यामुळे सगळीकडे पसरतील यामुळे तिचे हात धुणे चालु झाले. खरेतर असे झाल्यानंतर जी काही काळजी घ्यायला हवी ती तिने घेतली होती. पण ह्याच विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातले होते. त्यामुळे कितीही हात धुतले किंवा कितीही स्वच्छ अंघोळ केली तरी तिचे समाधान होत नव्हते.
ह्या शंकाकुशंका नेहमीच मोठ्या असतील असे काही नाही, अगदी छोट्या छोट्या शंका सुद्धा खुप जहाल रूप घेतात. मी घराला कुलूप लावले की नाही? या शंकेने चार चार वेळा, चार मजली चढ उतार करणारे देखील असतात. असे केल्याने त्यांना क्षणिक समाधान मिळते देखील पण लगेच तिच शंका मनाचा ताबा घेते, आणि ती व्यक्ती बऱ्याच वेळा मग घरातून बाहेर पडायचेच टाळते.
काही ऑबसेशन्स मोजण्या संदर्भातील असतात. सकाळी उठल्यापासून हे चालू होते, कितीवेळा डाव्या आणि उजव्या बाजूने दात घासायचे, घराला किती दार आणि खिडक्या आहेत, खाली किती फरश्या आहेत. जिना उतरताना किती पायऱ्या उतरलो, बाजुने जाणाऱ्या गाडीला किती चाके आहेत, किती कार गेल्या, किती लोकांनी छत्री घेतली होती. सारखे काहीना काही मोजत असतात. असे मोजुन काहीही होणार नाही हे त्या व्यक्तीला सुद्धा माहिती असते पण काही केल्या थांबवता येत नाही.
असे विचित्र विचार मनात येत राहिले की त्यांना टाळण्यासाठी काही निरर्थक क्रिया रुग्णांना कराव्या लागतात. गणेशच्या मनात असे काही विचार आले की तो तीनदा चुटकी वाजवे, अशी तीनदा चुटकी वाजवली नाही तर त्याच्या मुलीला काहीतरी होईल अशी भीती त्याला वाटे. घरी त्याला काही अडचण नाही यायची पण कॉर्पोरेट मीटिंग मध्ये मात्र त्याची अडचण होऊ लागली. हे नाही केले तर ते होईल. ते नाही केले तर हे होईल अशा भीतीखाली हे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात. यांना कम्पलशन (Compulsion) म्हणतात.
अश्या प्रकारच्या कम्पलशनमध्ये रुग्णाला मनाला समाधान मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा एखादी कृती करावी लागते. जसे की वारंवार हात धुणे, वारंवार कुलूप चेक करणे, ठराविक पावलानंतर एक पाऊल मागे घेणे, ठराविक पद्धतीनेच अंघोळ करणे, वारंवार देवाला नमस्कार करणे. अश्या क्रिया रोजच्या व्यवहारातील असतात, पण रुग्ण ह्या क्रिया रुग्ण एखादे काल्पनिक संकट दुर करण्यासाठी करत असतो. उदा. देवाला नमस्कार केला नाही तर आईचा मृत्यू होईल, दारातून पाचवेळा आतबाहेर केले नाही तर गाडीला अपघात होईल. हे आपण उगाचच करत आहोत, अश्या कृतीचा आणि संकट निवारण्याचा काहीही संबंध नसतो, तरीही अश्या कृती केल्यावर त्यांचं तात्पुरतं समाधान होत. म्हणून तो अशी कृती करत राहतो. इतकंच नाही तर असं करायचं नाही म्हणून त्याला कोणी अडवले तरी तो बेचैन होतो.
आपल्या मनात येणारे विचार, आपली कृती हे निरर्थक आहेत याची जाणीव बऱ्याच जणांना असते पण सगळ्यांना नाही. आपण जे करत आहोत ते योग्यच आहे आणि असेच व्हायला हवे यात त्यांना काहीही शंका नसते.
सौ. काळे यांना घेऊन त्यांचे यजमान आले होते. त्यांना सुरुवाती पासून टापटीपीची आवड आहे. पण आजकाल त्यांच स्वच्छतेचं वेड फारच वाढले होते. त्या घर घाण झाले म्हणून सकाळपासून पाच सहा वेळा घर धुवून काढत होत्या, कोणीही बाहेरून आले तरी हात पाय धुतल्याशिवाय सुटका नाही, पाहुण्यांची सुद्धा. पाय पुसूनच बेडवर बसायचे अश्या गोष्टींमुळे त्यांची घरच्यांबरोबर खटके उडू लागले होते. आणि सगळ्यात महत्वाचे जे मिस्टरांनी सांगितले ते म्हणजे, विष्टे बद्दल वाटणारी कमालीची किळस, तिकडे जावे लागू नये म्हणून यांनी गेल्या दोन दिवसांपासून जेवण बंद केले आहे. त्यामुळे ते आज मला भेटायला आले होते.
यामध्ये प्रत्येक कम्पलशन बाह्य कृती मधेच दिसेल असेही नसते. ब्लॉकिंग कम्पलशन (Blocking Compulsion) म्हणजे वाईट विचार येऊच नये म्हणून केले गेलेले प्रयत्न किंवा आलेल्या विचारांचा विचाराने काढलेला मार्ग. असे लोक खुप वेळा प्रार्थना करतात. कधी कधी एकटे असताना ही प्रार्थना थोडी मोठ्याने पण अस्पष्ट केली जाते, यालाच नातेवाईक एकटे एकटे बोलणे म्हणू शकतात. सुरेश एक कम्प्युटर इंजिनीयर आजकाल खुप हळू हळू कामे करू लागला होता, जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा कळले की त्याला बऱ्याच काल्पनिक अडचणी येतात आणि तो जोपर्यंत मनामध्ये त्यांचे उत्तर शोधत नाही तोपर्यंत तो बाकीच्या कामाकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्याचा कामाचा वेग मंदावला आहे.(Obsessive Slowness)
असे रुग्ण जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा प्रचंड चिडचिड करतात. या चिडचिडीला वैतागुन मग घरातलमंडळी सुद्धा त्यांना मदत करू लागतात.(Proxy Compulsion). मुलाच्या अंघोळीला पाणी भरून ठेवणारे, स्वच्छता ठेवण्यामध्ये मनाविरुद्ध काम करणारे. बायकोचा वेळ स्वच्छतेमध्ये जातो म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवणारे किंवा मग रुग्णाच्या पुजेअर्चे मध्ये मदत करणारे नातलग यात येतात. असे केल्याने त्यांचा त्रास जरी कमी होत असला तरी आजार मात्र वाढत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही, आणि जेव्हा येते तेव्हा आजाराने आपली पाळेमुळे घट्ट केलेली असतात.
ओसीडी ची सुरुवात बऱ्याचवेळा तारुण्यात होते. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात हा आजार आढळतो. मेंदू मधील प्रीफ्रँटल कॉरटेक्स, स्ट्रायटम आणि थॅलॅमस या मेंदूतील भागांमध्ये होणार बिघाड आणि सेरोटॉनिन या केमिकल ची कमतरता यामुळे हा आजार होतो.
ह्या लेखाचा उद्देश एवढाच की, या आजाराबद्दल जनजागृती व्हावी. कारण असा विचारांचा आजार असतो आणि त्यामुळे माणूस त्याच्या मनाविरुद्ध असे विचित्र वागू शकतो ह्यावर तसा विश्वास बसणे जरा अवघडच. त्यामुळे रुग्णाला नाटकी म्हणण्यापासून मारण्यापर्यंत एवढे थोडे म्हणून भोंदू बाबांकडून मारहाण करण्यापर्यंत घटना मी पाहिल्या आहेत.
ओसीडी या आजारावर आता गुणकारी औषधे उपलब्ध आहेत, माझ्यासारखे मनोविकार तज्ञ यावर उपचार करतात.