वर्ल्ड बायपोलार डे ( World Bipolar Day )
“कभीखुशी कभी गम” हा पिक्चर पाहिलाय का हो ? तगडी स्टारकास्ट आहे त्यामुळे खुप लोकांना आवडला सुद्धा.माझ्यामते या पिक्चर मध्ये कधीतरीच खुशी आणि बऱ्याच वेळा गमच आहे.पणखऱ्या आयुष्यात “कभी बहुत खुशी और कभी बहुत गम” असे झाले तर? केलाय कधी असा विचार ? असे कधी होते का ? असाही विचार आला असेल. नैराश्याविषयी (Depression) बऱ्यापैकी जनजागृती होतीये, पण या लक्षणांच्या विरूद्ध लक्षणे असणाराही आजार असतो त्याला आम्ही उन्माद (हर्षवायु/ Mania)असे म्हणतो. या दोन्ही अवस्था नैराश्य आणि उन्माद एकामागे एक अश्या आल्या किंवा एकाच वेळी दोन्ही अवस्थांची लक्षणे असली तर याला आम्ही मनोविकारतज्ञ, द्विधृवीय(Bipolar) आजार असे म्हणतो. हो असा आजार असतो. आणि याच्या जनजागृतीसाठी आजचा 30 मार्चहा दिवस.
कुठलीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली की ती विषासारखे काम करते, असे गौतम बुद्ध सांगुन गेलेत. सुख आणि दुखः या बाबी आयुष्याचे अविभाज्य अंग आहेत, पणदोन्हीही गोष्टी मर्यादेपेक्षा जास्त झाल्या, आपल्या दैनंदिन जिवनात त्यामुळेअडचणी तयार करायला लागल्या तर त्या आजार होतात, आणि त्याविषयी माहिती मिळावी हा या लेखाचा उद्देश.
ह्या आजारामध्ये बऱ्याच वेळा सगळ्यांच्याच नजरेत भरतील अशीच लक्षणे असतात, तर कधी कधी अगदी सिनेस्टाईलने सामोरे येतात. अशीच एक रुग्ण अलका (नाव बदलले आहे),२७ वर्षांची तीन वर्षांपूर्वी लग्न झालेली. तिची बहिण तिला तिच्या मनाविरुद्ध घेवून आलेली. गेल्या १० दिवसांमध्ये खुपच नाट्यमय गोष्टी तिच्याबरोबर झाल्या होत्या, त्यामुळे नवऱ्याचे आणि तिचे वारंवार खटके उडत होते आणि वैतागुन त्याने तिला दोन दिवसांपुर्वी माहेरी सोडले होते. नवऱ्याच्या मते आजकाल ती खुप बोलते,अनोळखी लोकांशी फोनवर बोलते, रात्री झोपत नाही, लैंगिक सुखाची इच्छा घरातल्यांसमोर व्यक्त करते. खुपच चिडचिडी झाली आहे. चार दिवसांपुर्वी तर एका तरुणाबरोबर त्याच्या गाडीमध्ये बसुन गेली आणि हे निमित्त तिला माहेरी सोडण्यासाठी पुरेसे होते. घरचे खुपच गडबडलेले होते. बहिण सांगत होती इथे घरी पण तसेच चालू आहे, त्यात घरी आल्यापासून दोन नंबर वरून सारखा तिला फोन येत होता, अगदी रात्री अपरात्रीसुद्धा. घरच्यांनी कालच पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. पोलीस त्या व्यक्तींच्या घरी सुद्धा जाऊन आलेले, त्या दोघांनी सांगितलेले की अलकानेच त्यांना लिफ्ट मागितली होती, मोबाईल नंबर आपणहून दिला होता आणि आठवण आल्यावर फोन कर असे सांगितले होते. असे सगळे झाल्यामुळे त्यांचाही गैरसमज झाला आणि ते तिला वारंवार फोन करत होते. हे ऐकून आई तर काल दिवसभर रडत होती, अलकाशी वाद घालत होती, काय करते आहेस म्हणून चिडत होती, तरी सुद्धा अलका वरती त्याचा काही खास परिणाम झाला नव्हता. अलकाच्या मते तिला जे पाहिजे ते तिने सांगितले आणि येथुन पुढेही सांगणारच ! त्यात काय चुकले ?
हे सगळे घरचे नाट्य कळल्यावर शेजारचे काका म्हणाले, त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा एका बरोबर असेच काहीसे झाले होते, तरी तुम्ही मनोविकार तज्ञांना भेटून घ्या. सुरुवातीला आढे वेढे घेवून घरचे तयार झाले आणि तिचीबहिण व वडील तिला माझ्याकडे घेवून आले होते.
अलकाला, उन्माद (हर्षवायु/ Mania) नावाचा आजार झाला होता. तिच्या लक्षणांवरून तिच्या आजाराचे निदान होत होते,पण आपल्या समाजामध्ये बाहेरचे होणे, बुवा- बाबा, झाडफुकयांची चलती आहे. त्यामुळे असाही आजार असतो, त्यावर माझ्यासारखे डॉक्टर असतात आणि योग्य उपचार सुद्धा उपलब्ध आहे, यावर लवकर विश्वासच बसत नाही. पणअलकाच्या बहिणीने आणि वडलांनी रास्त शंका विचारल्या आणि मी त्याची समर्पक उत्तरे दिल्यावर त्यांचा विश्वास बसला आणि पुढील उपचाराचा मार्ग मोकळा झाला.
अश्या आजारांमध्ये व्यक्ती प्रमाणाबाहेर खुश असते, खुपमोठ्या मोठ्या गोष्टी बोलते (गाणे म्हणते, डान्स करते) आणि तसे वागते सुद्धा, अनोळखी माणसांबरोबर सुद्धा एकदम जुनी ओळख असल्यासारखे बोलायला लागते. प्रसिद्ध लोकांबरोबर (उदा. राजकारणी, सिनेअभिनेता) ओळख आहे असे सांगते. झोपत नाही, कारण विचारले तर झोपेत कशाला वेळ वाया घालवायचा, खुप सगळी लोक कल्याणाची कामे करायची आहेत असे काहीतरी सांगते. अनावश्यक गोष्टींवर खुप पैसा खर्च करते, व्यवसायामध्ये चुकीचे आर्थिक निर्णय घेते. जलद बोलते, आणि मध्ये टोकले तर एकदम चिडून जाते. जास्त प्रमाण असेल तर मला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली आहे असेही बोलू शकते. लैंगिक भावना जास्त तीव्र होतात, याचा त्याच्या जोडीदाराला त्रास होतो.
वरील लक्षणे ही मेंदूतील कार्यपद्धतीत झालेल्या बदलांमुळे होतात. मेंदूच्या रचनेत बिघाड नसतो तर मेंदूतील वेगवेगळ्या ठिकाणांमधील संदेशवहनामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे ही लक्षणे दिसुन येतात. तसेचमेंदूमधील काही केमिकल्स जसे की डोपामाईन आणि सिरोटोनिन यांच्या वाढलेल्या पातळ्या या आजाराला प्रामुख्याने जबाबदार असतात. फक्त एवढेच नाही तर अनुवांशिकता देखील याप्रकारच्या आजारांमध्ये महत्वाची ठरते. रक्ताच्या नात्यामध्ये जर असा आजार कोणाला असेल तर त्या कुटुंबातील बाकीच्यांना असा आजार होण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. पण घरामध्ये आहे म्हणजे सगळ्यांनाच असाच आजार होणार असेही नसते.
आनंदी राहणे ही खुप महत्वाची गोष्ट आहे पण जर याचादेखील अतिरेक झाला त्यामुळे रोजच्या आयुष्यात अडचणी व्हायला लागल्या, नातेसंबंधावरती, आर्थिक परिस्थितीवर आणि सगळ्यात महत्वाचे स्वतःच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला आणि हा त्रास ७ दिवसांपेक्षा जास्त चालला, तर नक्कीच मनोविकार तज्ञांची भेट घ्यावी.लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या आयुष्याची जबाबदारी जाणा आणि मदत घेण्यात कुठलाही कमीपणा मानू नका. अलकाने आणि तिच्या घरच्यांनी मदत घेतली आणि घडलेलं सगळे आजारामुळे झालंय हे पटल्यावर आणि पोलिसांनी बाकी शहनिशा केल्यावर तिचा संसार सुद्धा सुरळीत झाला, एकंदरीत सगळे आयुष्यच बदलले.
या लक्षणांच्या एकदम विरोधी लक्षणे जसे की नाराज वाटणे, रडू येणे, आधी छान वाटणाऱ्या गोष्टींमध्ये देखील आनंद न मिळणे, खुप थकवा जाणवणे, आत्मविश्वास खचून जाणे, एकटेपणा जाणवणे, भुक आणि झोप जास्त किंवा कमी होणे, वजन कमी होणे, आत्महत्येचे विचार येणे किंवा प्रयत्न करणे. हे सर्व १४ दिवसांपेक्षा जास्त झाले तर ही सगळी नैराश्य (Depression) या आजाराची लक्षणे आहेत. यामध्येत्या व्यक्तीला कशामध्येच आनंद मिळत नाही, रोजची कामेसुद्धा एकदम डोंगराएवढी होवून जातात. याचवेळीजवळच्या व्यक्तींनी घेतलेली काळजी सुद्धा यांना ओझे वाटायला लागते आणि या सगळ्यांचा दोष ते स्वतः वर घेतात आणि अजुन खचुन जातात. यातुनच त्यांची लक्ष देण्याची क्षमता आणि एकाग्रता कमी होते, ते गोष्टी विसरायला लागतात. आणि हे सगळे त्यांनी घेतलेले टेन्शन आहे म्हणून मग सगळेच त्यांना छान छान सल्ले दयायला चालु करतात. या सल्ल्यांमुळे कोणाला लाभ झालेला मी तरी पहिला नाही.स्ट्रेस (तान) येणे वेगळे,आणि डिप्रेशन चा आजार होणे वेगळे. आजाराला औषधोपचारच लागतो फक्त बोलणे काहीच कामाचे नाही.
बऱ्याचरुग्णांमध्ये ही लक्षणे नैराश्य (Depression) आणि उन्माद (हर्षवायु/ Mania),जी एकदम दोन टोकाची लक्षणे आहेत एकामागे एक येतात. आणि असे झाले की याला द्विधृवीय(Bipolar/ बायपोलार )आजार असे म्हंटले जाते. दोन्हीही नैराश्य आणि उन्माद या आजारांपेक्षा द्विधृविय आजार हा रुग्णाच्या आयुष्यावर जास्त परिणाम करतो. कारण रुग्ण जेव्हा उन्माद मध्ये असतो तो खुप सगळ्या अनावश्यक गोष्टी करून बसतो ज्याच्यामुळे त्याला खुप अडचणी येतात आणि त्यामुळे तो नैराश्यामध्ये जाऊन अधिकच त्या अडचणी सोडवायला असमर्थ बनतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्रास देणारा रुग्ण जेव्हा शांत होतो हा घरच्यांसाठी खुप मोठा दिलासा असतो आणि यामुळेच ते नैराश्याची लक्षणे ओळखु शकत नाहीत आणि रुग्ण आत्महत्या करून दगावू शकतो.
कधीकधी रुग्ण हा हायपोमॅनिया मध्ये असतो. म्हणजे लक्षणे सगळी उन्मादाची असतात, पण त्यांचा रुग्णाच्या दैनंदिन जिवनावर काहीही परिणाम झालेला नसतो. असे रुग्ण त्यांच्या घरामध्ये आणि मित्रांमध्ये अगदी धमाल उडवून देतात, हे एवढे आनंदी असतात, की सगळ्यांना सुद्धा हसवतात. पण हे त्यांच्या नेहमीच्या स्वभावाच्या विपरीत असते म्हणून आजार.
एकाबाजूला मी खुप मोठा, माझ्या खुप ओळखी आहेत, मी काहीही करू शकतो असे बोलणारा आणि दुसऱ्या बाजुला एकलकोंडेपणा, निराशा, हताशपणा, खचलेला आत्मविश्वास, माझे भविष्यात काहीच होवू शकत नाही असा विचार करणारा. रुग्ण या दोन टोकाच्या भावनांमध्ये हिंदोळत राहतो.
डॉक्टरांना या आजाराचे निदान करताना येणाऱ्या अडचणी.
१) कोणत्याही वयोगटात होऊ शकतो.
२) लक्षणे एकदम वेगळी वेगळी असतात.
३) बऱ्याचवेळा रुग्ण नैराश्याची लक्षणे असताना येतो. त्यामुळे नैराश्याचे निदान होते.
४) या आजारामध्ये किंवा या आजारामुळे व्यसनाचे प्रमाण वाढते, बऱ्याचवेळा रुग्ण व्यसनमुक्ती साठी येतो.
५) योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचून निदान होईपर्यंत ४ ते १० वर्षे लागतात.
तर असा हा आजार शंभरामागे दोन ते चार जणांना होतो.जेवढ्या लवकर याचे निदान होवून औषधोपचार चालु होईल तेवढा रुग्ण यातुन लवकर बाहेर पडण्याची शक्यता जास्त. जसे आपण वर पहिले की डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत सात ते आठ वर्षे वाया जातात.जेवढाजुनाट आजार तेवढा चिवट तो बनतो. जनजागृतीहाच एक महत्वाचा पर्याय आपल्या सगळ्यांसमोर आहे. चला या मानसिक आरोग्य जानाजागृतीमध्ये आपणही सामील होवुया.
कुतूहल जागे करणारी गोष्ट अशी आहे की, जर या आजाराचा मनुष्याच्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही तर हा आजार टिकून कसा राहिला ? म्हणजे उत्क्रांतीमध्ये आपल्यात बरेच बदल झाले, शेपूट गेले, कान हलवता येत नाहीत, अंतर्गत अवयवांमध्ये सुद्धा बदल झाले, थोडक्यात जे नको ते सगळे नष्ट झाले, पण हा आजार टिकूनच आहे. याचे काही संशोधनामध्ये एकदम धक्कादायक स्पष्टीकरण आहे. ज्या लोकांच्या घरात असा आजार असतो त्याच घरातील लोक हे जास्त क्रिएटिव्ह असतात. म्हणजे कलाकार, चित्रकार, संगीतकार, लेखक, खेळाडू किंवा संशोधक अशी एकदम यशस्वी असतात. म्हणजेच ह्या आजाराची आणि क्रिएटिव्हीटी ची जनुके एकाच असू शकतात. त्यामुळेच हा आजार टिकून आहे.
अश्या या आजाराची माहिती तुम्हीही घ्या आणि इतर गरजू लोकांनाही सांगा, मी जसे केले तसे.