Schizophrenia ( स्किझोफ्रेनिया )
आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, त्या निमित्ताने ह्या खुप मोठ्या आजाराची छोटेखाणी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक (मनाचा आणि मेंदूचा) आजार आहे.
माणसाला माणुसपण देणाऱ्या गोष्टी, जसे कि विचार करण्याची शक्ती, भावना व्यक्त करता येणे, समाजाभिमुख व्यवहार करणे. नेमक्या यांच गोष्टींवर हा आजार हल्ला करतो, आणि त्या रुग्णाचे माणुसपण मग हरवून जाते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आजार सुरु होतो तोच मुळी आयुष्याच्या २० ते ३० या वयोवर्षांमध्ये (जेथून खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात होते) (Greatest Disabler Of Life).
पण चांगली गोष्ट हि आहे की, लवकर निदान आणि योग्य औषधोपचार याने हा आजार नियंत्रणात राहु शकतो.
हा आजार कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो. स्त्री पुरुषांमध्ये सारख्याच प्रमाणात आढळतो. जगामध्ये शंभरातल्या एका व्यक्तीला हा आजार आहे. भारतामध्ये जवळ जवळ १ कोटी लोकांना हा आजार आहे.
अजुनही हा आजार नक्की कसा होतो हे माहिती नाही. पण काही जनुकीय, मेंदूमधील रसायनात होणारे बदल, मेंदुच्या जडण-घडणी मध्ये होणारे बदल आणि ज्या वातावरणात रुग्ण वाढतो यांचा हा आजार होण्यामध्ये खुप मोठा वाटा आहे.
याची लक्षणे प्रामुख्याने कानात आवाजाचे भास होणे, शंका करणे, एकांतात बडबड करणे, स्वभावात व प्रवृत्तीत बदल होणे, स्वत:ची काळजी न घेणे, कामात संसारात मन न लागणे, उदास आणि नाराज राहणे किंवा खुप चिडचिड करणे.
हा आजार असणारे जवळ जवळ १० % रुग्ण आत्महत्या करतात.
स्किझोफ्रेनिया हा असा आजार आहे, ज्याची योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य ते दिवस जर औषधे घेतली नाहीत तर हा आजार उत्तरोत्तर वाढत जातो. हा एक आजार आहे, आणि योग्य ती औषधे उपलब्ध आहेत. बुवा बाबांच्या नादी लागुन बरेच रुग्ण खुप मौल्यवान वेळ वाया घालवतात. कारण जेवढ्या लवकर योग्य औषध उपचार सुरु होईल तेव्हढ्या प्रमाणात हा आजार जास्त नियंत्रणात राहु शकतो.
या आजाराच्या उपचारामध्ये कुटुंबाचा सिंहाचा वाटा असतो. कारण खुप रुग्ण हेच मान्य करत नाहीत कि त्यांना काही आजार आहे, मग औषधे घेण्याचा प्रश्न येतोच कुठे. एव्हढेच नाही तर एकदा आजार नियंत्रणात आल्यानंतर तो पुन्हा होऊ नये यात देखील कुटुंब खुप मोठी भुमिका बजावते.
तसे पाहायला गेले तर सध्या स्किझोफ्रेनिया ह्या आजारामध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा समाजाचा आहे पण नकारात्मक. हि नकारात्मकता मग ह्या आजाराला अजुन भयंकर बनवते. यामुळे उपचार उपलब्ध असुन देखील ते घेण्यात टाळाटाळ होते. ते कुटुंब (हो कुटुंब) सामाजिक मानहानी सोसते. हे सर्व टाळून आपण एक आदर्श समाज म्हणून जेव्हा हे मान्य करू की, शारीरिक आजारांइतकेच किंवा कदाचित काकणभर जास्तच मदतीची गरज हि मानसिक आजार असलेल्या रुग्णांना असते. व आपण ती मदत त्यांना मिळवून देण्यात त्यांना योग्य ती मदत करू तेव्हा आपण माणूसपणा मध्ये नक्कीच एक पाऊलपुढे गेलेलो असु.