मनाची शांती (How to achieve Peace of Mind)
मनाची शांतीतरी मी मानतो कि माहितीची उपलब्धता. ही आपल्या पिढीची सर्वात मोठी ताकद आहे. अक्षरशः कुठल्याही गोष्टीविषयी माहिती आपल्याला एका क्षणात मिळते, ती इंटरनेटच्या झालेल्या अवाढव्य प्रगतीमुळे, आणि स्मार्ट फोन मधील सुधारणांमुळे आपल्याला हे इंटरनेट वापरणे खुपच सोपे झाले आहे. आपल्यावर नुसता माहितीचा भडीमार होत आहे. एक सर्वेक्षण असे सांगते कि १९०० शतकात एका माणसाला जेवढी माहिती त्याच्या संपूर्ण आयुष्यात मिळत होती, ती आज एका आठवड्यात मिळते आहे. यावरून माहितीच्या प्रचंडतेची जाणीव तुम्हाला आलीच असेल.
तुम्ही म्हणाल हे डॉक्टर पण माहितीच्या महापुरात गडबडलेत
वाटते, विषय काय आहे आणि काय सांगत आहेत. पण एवढी प्रस्तावना यासाठी दिली की, जसे या माहितीच्या महापुराचे फायदे आहेत तसेच तोटेही असणारच ना.
माझ्यामते सर्वात मोठा तोटा. “आपण शांत राहणे विसरत चाललोय.” आणि हिच ती गोष्ट आहे जी आपल्याला आनंदी राहू देत नाही. त्यामुळे आपण सतत नाखूष राहतो. एवढे कि बऱ्याच जणांना दुखी राहण्याची, चिंता करण्याची सवयच लागून जाते. मग फावल्या वेळात (जो ते खुप चांगल्या पद्धतीने वापरू शकतात) फक्त चिंता कशी घालवायची याची माहिती मिळवण्यासाठी वाया घालवतात. (हो वाया घालवतात! कारण फक्त माहिती घेतात कृती करण्यासाठी कुणाला वेळ आहे.)
आता डोळे झाकुन विचार करा. शेवटचे तुम्ही कधी शांत बसला होतात(Facebook & Whats app सुद्धा बंद हा)? कधी तुम्ही फक्त स्वतःसाठी वेळ काढला होतात ? आणि त्याचा यथेच्छ उपभोग घेतला होतात.(Restore, Refocus, Revitalize)
सततच्या ऑनलयीन राहण्यामुळे (सोशल मेडिया) आपण नकळत दुसऱ्यांबरोबर आपल्या आयुष्याची तुलना करत बसतो. त्यातून आनंदी होण्याऐवजी अजुन नाराज होतो.
जगातील सर्व प्राचीन आणि थोर विचारवंताचे एका गोष्टीवर एकमत आहे ते म्हणजे “तुमच्या अडचणींवर तुम्हीच मात करू शकता आणि त्यासाठी, तुम्ही स्वतःसाठी शांत राहण्यासाठी वेळ काढायलाच हवा.” जे असे म्हणतात कि त्यांच्याकडे शांत राहण्यासाठी वेळ नाही. हे म्हणजे असे झाले कि , तुम्ही गाडी चालवण्यात इतके व्यस्त आहात की तुमच्याकडे पेट्रोल टाकायला वेळ नाही. रोजची शांततेची काही मिनिटे, तुम्हांला तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर फोकस राहण्यासाठी खुप महत्वाची आहेत.
मनाच्या शांततेमध्ये दुसरा महत्वाचा अडथळा म्हणजे, नकारात्मक बातम्या. आपल्या समाजात कोणाचे? कसे? कधी? आणि कशामुळे वाईट झाले? या बातम्या टीआरपी मिळवुन जातात आणि एखाद्या चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष होते. माझा मुद्दा हा नाही की बातम्या वाचु अथवा पाहू नये. खुप सगळ्या चांगल्या बातम्या पण असतातच ना. माझा मुद्दा सोपा आहे, तुम्ही कोणत्या बातम्या वाचायच्या हे विचार करून ठरवा. कारण आपले मन त्याच गोष्टींवर विचार करते, ज्या आपण आतमध्ये टाकतो. त्यामुळे चांगल्या बातम्या जरूर पहा/वाचा. पेपर वाचण्याच्या आधी काहीतरी हेतू ठेवून पेपर वाचा, उगाच सगळा पेपर वाचण्यात काही अर्थ नाही.
तिसरा आणि जो आपण सहजरीत्या नियंत्रणात आणू शकतो असा भाग म्हणजे “वेळेचे नियोजन”. सध्याचे जीवन म्हणजे महायुद्धासारखेच आहे. एकाच वेळी किती त्या जबाबदाऱ्या जोडीदार, मुल, आई–वडील, नातेसंबंध, मित्र, ऑफिस, नोकरी आणि घरखर्च. सारखे या ना त्या दिशेने आपण लढत असतो, बरोबर ना. मग कुठून वेळ मिळणार! मनाच्या शांततेसाठी. वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो (आपणास हे माहिती आहे, पण मी म्हणेन हे अंमलात आणा). वेळेचे काटेकोर नियोजन आपला वेळ फुकट वाया जाऊ देत नाही.
कुणाच्याही विनंतीला मन देवून हो म्हणणे सोपे असते, पण आदरपूर्वक नाही म्हणणे अवघड जाते. नाही म्हणण्याची शक्ती नसणे हेही मनाची शांतता भंग करण्यामागचे मोठे कारण आहे. कारण यामुळे आपण अनावश्यक जबाबदाऱ्या अंगावर घेत राहतो आणि स्वतःची मनःशांती गमावून बसतो.
यावर उपाय काय तर, असे आयुष्य जगायला शिका ज्यामध्ये तुमच्या मनाचाही विचार तुम्ही कराल. असे परिपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर मनाला छान विश्रांती मिळायलाच हवी.
शेवटी जाता जाता. आपण काही मशीन नाही आहोत नेहमीच काम करायला. तर माणूस हा स्वजागृती असलेला सर्वात पुढारलेला प्राणी आहे. जो स्वतःच्या परिस्थितीचे आकलन करून त्यात बदल करू शकतो. तर तो तुम्ही करालच हि अपेक्षा.
Published in Deshdoot NEWS Paper