प्रेमाचे सोहळे !!! (Experience in Field of Deaddiction)
प्रेम प्रेम प्रेम… म्हणजे काय असते ?
सर्वात सोपी व्याख्या “प्रेम हे प्रेम असते” (अनन्वय अलंकार). आणि आपल्या बॉलीवुड ने शिकवलेली सर्वात महत्वाची व्याख्या म्हणजे “मुलाने मुलींसाठी व्यक्त (बऱ्याचवेळा अव्यक्त केलेली) भावना.” पण त्यासाठी हा लेखनप्रपंच नाही, त्यासाठी बॉलीवुडचा कुठलाही सिनेमा पहावा. पण मानसोपचारतज्ज्ञ म्हणुन काम करताना आम्ही प्रत्येक वेळेस वेग वेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे सोहळे पाहत आणि अनुभवत असतो, ते शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.
सर्वात सोपी व्याख्या “प्रेम हे प्रेम असते” (अनन्वय अलंकार). आणि आपल्या बॉलीवुड ने शिकवलेली सर्वात महत्वाची व्याख्या म्हणजे “मुलाने मुलींसाठी व्यक्त (बऱ्याचवेळा अव्यक्त केलेली) भावना.” पण त्यासाठी हा लेखनप्रपंच नाही, त्यासाठी बॉलीवुडचा कुठलाही सिनेमा पहावा. पण मानसोपचारतज्ज्ञ म्हणुन काम करताना आम्ही प्रत्येक वेळेस वेग वेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे सोहळे पाहत आणि अनुभवत असतो, ते शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.
गुरुवारची संध्याकाळ. एका हॉस्पिटल चा कॉल आलेला, ९:३० ला ओपीडी संपवून पेशंट पहायला गेलेलो. वैभव, २२ वर्षांचा नुकताच ग्रॅज्युएट झालेला मुलगा व्यसनमुक्तीसाठी अॅडमिट केलेला. त्याने शेवटची दारू घेतलेली सोमवारी, अॅज एकस्पेक्टेड तो अल्कोहोल विथड्रॉवल डेलीरीयम मध्ये होता. अल्कोहोल विथड्रॉवल डेलीरीयम, हे सुद्धा शेवटची दारू घेतल्यानंतर ७२ तासांनी होण्याची सर्वात जास्त शक्यता असते.
प्राथमिक माहिती घेतल्यानंतर कळाले की, तो एक खुप छान गिटार वाजवणारा, संगीताची आवड असणारा, विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून बक्षीसे मिळवणारा, मित्रांमध्ये मिसळणारा पण आईच्या अतिलाडाने आणि पालकांच्या व्यसनाच्या सुरुवातीला केलेल्या दुर्लक्ष्यपणामुळे व्यसनाच्या आहारी गेलेला असा मुलगा आहे. कारण एवढ्या लहान वयात डेलीरीयम मध्ये जाणे हे त्याचे दारू पिण्याचे प्रमाण नकळत दर्शवत होते.
आणि येथुन पुढे प्रेमाचे सोहळे चालू झाले.
गुरुवार, मित्र सोहळा :- “अहो डॉक्टर ! चांगले दारू सोडायची म्हणून भरती केला, तो स्वतः चांगला हसत, खेळत चालत आलेला हो. २ दिवस व्यवस्थित होता, पण आता पहा ना कसे नाटकं करतोय. ओरडतोय काय, सलायणाच्या नळ्या ओढतोय, कुणाचेही ऐकत नाहीये. घरीच बरा होता, इथे भरती केला म्हणूनच असे झाले. डॉक्टरांच्या औषधांमुळेच हे होतंय. तुम्ही यातले तज्ञ आहात पहा बरे व्यवस्थित आहेत ना औषधे, आम्हांला खुप काळजी वाटते आहे हो.”
शुक्रवार, पितृ सोहळा :- “अहो डॉक्टर ! किती औषधे देणार हो त्याला ? त्याचा मेंदू खराब होवून जाईल ना, असे झाले तर त्याला कोण जबाबदार ? याच्या आधी कधीच अॅडमिट नव्हता झाला हो. हा थोडी दारू प्यायचा (खरे प्रमाण ३ क्वॉर्टर्स् = 18Units of Alcohol) पण म्हणून एवढी औषधे, तुम्ही जरा औषधांचे प्रमाण कमी करा हो !”
शनीवार, मातृ सोहळा :- हा पाहण्यासारखाच होता, पण त्यापेक्षा तो अनुभवणे आणि त्याला समर्पक उत्तरे देताना, माझी पूर्ण कसोटी लागली होती.
“डॉक्टर हा नीट होणार ना हो ! मीच डोक्यावर चढवला होता, त्याचीच हि फळे आहेत. पण आता याने एका आठवड्यात १००% दारू सोडलीच पाहिजे.” एवढी मोठी अपेक्षा म्हंटल्यावर, जरा वस्तुस्थितीची जाणिव व्हावी म्हणून मी बोललो, “आपण प्रयत्न करू, पण अशी जादूची गोळी अस्तित्वात नाहीये.” असे बोलल्यानंतर त्या अवस्थेतही त्या मातेचे बदललेले हावभाव लक्षात राहण्यासारखे आहेत. “१००% नाही सोडणार म्हणजे काय ? मग आम्ही अॅडमिटच कशाला केले ह्याला ? एवढा खर्च केला. त्याने दारू सोडलीच पाहिजे, मी आत्ताच ज्योतिष्याला भेटून आले आहे. त्यांच्यामते ग्रहदशा खराब आहे म्हणून त्याला हा त्रास होतोय, पुजा सांगितली आहे. (रु…../- चार अंकी)
तरीसुद्धा माझ्यापरीने मी शास्त्रीय दृष्ट्या आजार व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत राहिलो. अजून २ दिवस तरी लागतील हा त्रास कमी व्हायला वगैरे वगैरे …
पण दुसऱ्या दिवशी सकाळीच कळाले की ती माता आधुनिक योग्य उपचार बंद करून त्याला पूजेकरता घेवून गेली आहे.
“देव त्यांचे भले करो.” (इतके हताश वाटते ना अश्यावेळेस)
या सर्व घडामोडींमध्ये मला पडलेला प्रश्न, हे सर्व लोक मित्र, वडील आणि आई आता जेवढी काळजी करत आहेत ना यातली १०% जरी योग्य वेळी घेतली असती तरी ही वेळ आलीच नसती. व्यसनी मित्रांची संगत, अनुवांशिकता, व्यक्तिमत्वामधील दोष आणि आयुष्यातील ताण-तणाव ही व्यसन सुरु करण्याची आणि वाढत जाण्याची प्रमुख कारणे आहेत. यापैकी, वैभवच्या व्यसनाच्या आहारी जाण्यामध्ये मित्रांचा आणि आई वडिलांमधील भांडणाचा खुप मोठा वाटा होता.
यातही जमेची बाजु म्हणजे (आशेचा किरण) या कुटुंबाचे लाड पुरवताना आणि त्यांना योग्य ती माहिती देताना, त्या हॉस्पिटल मधील स्टाफ, दुसरे पेशंट बरेच काही शिकत होते. आणि हो नंतर वेगळे भेटून दिलेल्या माहितीबद्दल आभार मानत होते. हा आनंदाचा सोहळा अनपेक्षित पण हवा हवासा वाटणारा होता. चला म्हणजे आपली मेहनत एकदमच पाण्यात नाही गेली तर, हे मनाला समाधान.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करताना अश्या मनाला निराशा आणणाऱ्या गोष्टी बऱ्याच वेळा घडतात. पण जेव्हा एखादे घर पुनर्जन्म घेते ना, तो सोहळा अवर्णनीय असतो.
हो आमच्याकडे घराचा पुनर्जन्म होतो आणि दुखावलेले, तुटलेले, खचलेले आणि एकटे पडलेले घर पुन्हा नव्या उमेदीने उभे राहते. तो प्रेमाचा सोहळा ह्या सर्व अडचणींशी मुकाबला करण्यासाठी बळ देत राहतो.
डॉ. मुक्तेश दौंड (मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ञ)
MBBS, DNB Psychiatry
श्री ऋषी सायकिअॅट्री क्लिनिक, पंचवटी, नाशिक.