बदलत्या जगातील तरुणाचे मानसिक आरोग्य ( Youth and Mental Health )
किशोरावस्था (Children) आणि प्रौढावस्था (Adult) या आयुष्याच्या दोन स्थित्यंतराच्या मध्ये, अतिशय नाजूक, चंचल, व आव्हानात्मक असा एक टप्पा असतो, तो म्हणजे तारुण्यावस्था. म्हणजेच आजकालची यंग जनरेशन..
सध्याच्या वेगाने बदलत्या काळात आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आयुष्यातील ह्या टप्प्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. हा काळ म्हणजे लहानपणीच्या कौशल्यांमध्ये भर घालण्याचा काळ, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याचा काळ. त्यामुळे, खरे तर सर्वाना हवाहवासा वाटणारा. पण या स्वातंत्र्या बरोबर येते ती जबाबदारी, आणि या वयात गोंधळ हा असतो की स्वातंत्र्य हवे पण जबाबदारी नको.
ह्या सर्वाबरोबर जीवनशैलीमधले खुप मोठे बदल देखील घडत असतात, जसे की, शाळेमधील बदल, घरापासून लांब राहणे, कॉलेज ला जाणे किंवा एखादे नवीन काम चालु करणे. मोठ्या जगाशी संबंध वाढतो, कोणती शाखा घ्यायची, कुठे राहायचं याचे निर्णय घ्यावे लागतात. मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्याची ओढ, विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण, हे सांभाळून नवीन नाते बनवायचे असतात.
बऱ्याच जणांसाठी हा खुप उत्साहाचा काळ असतो पण याचबरोबर बऱ्याच जणांसाठी हा तणावाचा आणि काळजीने भरलेला असतो. आणि सर्वात महत्वाचे ही काळजी आणि तणाव खुप वेळेला त्या व्यक्तीच्या सहनशक्ती पलीकडचा असतो. अश्यावेळेस हा तणाव लक्षात येऊन त्याचे नियोजन होणे हे खुप महत्वाचे असते. आणि जर हे सर्व दुर्लक्षित राहिले तर ते मानसिक आजारांना निमंत्रण देणारे ठरते.
यात भरीस भर म्हणून, इंटरनेटचा (समाज माध्यमे) वाढलेला अमर्याद वापर, नक्कीच याचे खुप फायदे आहेत, पण हेच माध्यम जास्तीच्या तणावाचे कारण ठरू शकते. गावी राहणारे, सर्व मुलभूत आणि जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा याला सामोरे जाणारे अजूनच तणावपूर्ण जीवन जगात असतात. या सर्व जास्तीच्या अडचणींना सामोरी जाणारी तरुणाई ही मानसिक आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.
अर्ध्यापेक्षा जास्त मानसिक आजार हे वयाच्या 14 वर्षाआधीच सुरु होतात. पण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी लक्षातच येत नाहीत. या वयामध्ये नैराश्य (Depression) हा तीन नंबरचा आजार आहे, यावरून याची व्याप्ती लक्षात यावी. आत्महत्या हा 15 ते 29 या वयोगटातील, मृत्यूस कारणीभूत ठरणारी दोन नंबरची गोष्ट आहे. याच वेळेस आपल्या सिनेसृष्टीत केलेले व्यसनांचे उद्दात्तीकरणामुळे मुले व्यसनांच्या आहारी जातात. यातुनच मग असुरक्षित गाडी चालवणे, असुरक्षित आचरण व वर्तन, अनियमित खाण्याच्या व झोपण्याच्या पद्धती. या चुकीच्या जिवनपद्धतीचा स्विकार केला जातो, जो की भविष्यातील बऱ्याच नकोश्या असणाऱ्या गोष्टींना कारणीभूत ठरतो.
आतापर्यंत समाजात आहे ती मानसिक आरोग्याविषयीची अनास्था, पण चित्र बदलते आहे.[ Growing recognition of the importance of building mental resilience]समाजात मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी आजकाल बऱ्याच गोष्टी चालू असतात. बरेच मदत करणारे हात आहेत, पण “मला स्वतःला मानसोपचाराची गरज आहे” हे आजच्या तरुणाला कळत नाही. कळलं तरी आत्मसात होत नाही, आणि आत्मसात झाले तर कोण काय म्हणेल भीतीने उपचार घेतले जात नाही.
जेव्हा आपण आपल्या रंग जनरेशनला समजून घ्यायला सुरुवात करू तेव्हा खरी जनजागृती सुरू झाली असे मानता येईल. आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे, त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे, आणि गरज असल्यास न डगमगता मानसोपचार तज्ञाची मदत घ्यायला पाहिजे. यासाठी पालक, शिक्षक आणि मित्र मैत्रिणी हे अतिशय महत्वाचा रोल होतात. पालकांनी संयमाने ऐकावे, पहावे व आधार द्यावा. शिक्षकांनी मानसिक दृष्ट्याही विद्यार्थ्याकडे पहावे, मदत करावी व काही शंका आल्यास वेळेत सुचवावे. मित्र मैत्रिणी हे सर्वात जवळचे नाते असते. या यंग जनरेशनला मित्रांनी सांगितलेले पटकन पटते. म्हणून आपल्या मित्र मैत्रिणी ने काही मनातल्या गोष्टी सांगितल्या, किंवा अति चिंता करत असल्यास योग्य सल्ला द्या. मोठ्यांची मदत घ्या. महत्वाचं म्हणजे कोणी मानसोपचार तज्ञा कडे जात असेल तर त्याला परावृत्त करू नये. गोळया बंद करण्यास सांगू नये.
लहानपणी पासून मुलांना आयुष्य जगण्याचे शिक्षण दिले पाहिजे. वर्गात पुस्तकामधील पुरेसे नाही. मुलांना कमतरतेची जाणीव असू द्या. त्यांचे लहान सहान निर्णय त्यांनाच घेऊ द्या आणि त्यातून शिकू द्या.वास्तववादी म्हणजेच शक्य साध्य निर्णय घेण्याची सवय लावा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा. समस्या सोडवण्याचे, त्यांचा सामना करण्याचे कौशल्य विकसित करा.
आपल्या यंग जनरेशन ला मानसिक दृष्टया बलवान, सामर्थवान बनवायचे असेल तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो.
आणि मग आपली तरुणाई खऱ्या अर्थाने ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंतांच्या कादंबरीतल्या ‘कर्णाच्या’ तारुण्याच्या वर्णनाप्रमाणे जगेल.
“तारुण्य ! ज्वलंत धमन्यांच अविरत स्पंदन ! निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर ! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग ! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत ! मनाच्या मयूराचा पूर्ण पसरलेला पिसारा ! फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा ! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा ! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा ! माणसानं मानानं मिरवायचा काळ ! काहीतरी मिळवायचा काळ ! शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ ! काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ !”
हे सर्व लिहिण्यामागे जनजागृती हा उद्देश आहेच पण औचित्य आहे ते जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे. 10 ऑक्टोबर हा 1992 पासुन जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणुन जगभर पाळला जातो. या दिनाचे निमित्ताने जगभर मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली जाते.
या वर्षीचे घोषवाक्य आहे, “बदलत्या जगातील तरुणांचे मानसिक आरोग्य.”[Young People and Mental Health in Changing World.] या निमित्ताने हा लेखनप्रपंच.